नांदेड, 13 ऑक्टोबर (हिं.स.) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवायची की स्वतंत्र लढवायची याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींसह महायुतीचे प्रमुख नेते ठरवतील. जर कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वबळावर लढविल, अशी माहिती आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कंधार येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
राज्यात महायुतीमधील नेते एकत्रितपणे काम करत आहेत, परंतु जिल्ह्यात मात्र महायुतीमधील राजकीय विसंवाद असतो. त्यामुळे महायुती म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रित लढविल्या जातील का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी वरिष्ठ पातळीवरून महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला व निर्णय होईल. महायुतीमधील महामंडळावरील नियुक्ती व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जागा वाटपाचा फॉर्म्युला यावर महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या विकास कामावर लढविल्या जातील. कंधार शहरातील रस्ते, नाली बांधकाम, क्रीडा संकुल आदी सोयी सुविधा देऊन विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध आहे. निवडणूक काळात विकासाचे मुद्दे मांडून जनतेचा कौल मागणार आहे, असे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
वरिष्ठ नेत्यात झालेला फॉर्म्युला सर्वांना मान्य करावा लागेल. जर कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा नेता म्हणून आमची सुद्धा स्वबळाची तयारी असल्याचे आ. चिखलीकर यांनी सांगितले.कंधार नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून अनेक जणांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे, परंतु पक्षातील सहकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार आहे. जो उमेदवार निवडणुकीत विजयासाठी सक्षम राहिल. त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करून घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
यावेळी बाबुराव केंद्रे उमरगेकर, माजी उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन, किशनराव डफडे, स्वप्नील पाटील लुंगारे, मधुकर पाटील डांगे, युवा नेते निलेश गौर, आसिफ शेख आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis