नाशिक, 13 ऑक्टोबर (हिं.स.): दरवर्षीप्रमाणे यंदाही स्तनाच्या कर्करोगावर जनजागृती करण्यासाठी पिंक मेला या अनोख्या उपक्रमाचे नाशिकमध्ये आयोजन केले होते. एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर आणि वॉव (वूमेन ऑफ विज्डम) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात जनजागृतीसह महिलांचे निखळ मनोरंजन झाले. यावर्षी पाचव्या आवृत्तीतील पिंक मेला उपक्रम मुंबई-आग्रा महामार्गावरील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथे पार पडला. याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उपक्रम संपन्न झाला.
या वर्षीच्या पिंक मेल्यात जवळपास ७०० महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक महिलेला स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूक करणे, लवकर निदानाचे महत्त्व पटवून देणे आणि आरोग्य, आनंद व एकत्रित उत्साहाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा होता. सुप्रसिद्ध ऑन्कॉलॉजिस्ट व एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. राज नगरकर यांनी अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेत स्तनाच्या कर्करोगाविषयी माहिती दिली. लवकर निदानाचे महत्त्व सांगताना डॉ.नगरकर म्हणाले, की वेळीच निदान झाल्याने कर्करोगावर औषधोपचाराने मात करता येऊ शकते. व जीवाचा धोका टाळता येतो. नियमित तपासण्या, योग्य जीवनशैली आणि मानसिक आरोग्याचे फायदे त्यांनी स्पष्ट केले. ज्यामुळे उपस्थित महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन करताना संवाद साधला.
या कार्यक्रमात डॉ. रूपाली खैरे, डॉ. संध्या खेडेकर, कांबळे मॅडम, मृणालिनी रनाळकर, ज्योति वाघचौरे, डॉ. प्राजक्ता जोशी, ज्योती पाटील, वैशाली बालाजीवाले यांचा समावेश होता. त्यांचा सत्कार सौ. प्रतिमा नगरकर यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एचसीजी मानवता टीम, तसेच वाव (Women of Wisdom) संस्था व पदाधिकारी, संस्थापिका अश्विनी न्याहारकर, अध्यक्ष विभा खोत, उपाध्यक्ष उज्वला बोधले, तसेच एचसीजी मानवताचे अनिरुद्ध शेंडे यांनी मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV