अलिबागमध्ये पंचायत समिती गण आरक्षण जाहीर; 14 पैकी 9 जागा राखीव
रायगड, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, 14 पैकी तब्बल 9 जागा विविध प्रवर्गांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत. तर 5 जागा सर्वसाधारण प्रवर्गासा
अलिबागमध्ये पंचायत समिती गण आरक्षण जाहीर; 14 पैकी 9 जागा राखीव


रायगड, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, 14 पैकी तब्बल 9 जागा विविध प्रवर्गांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत. तर 5 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या राहणार आहेत. यामध्ये महिलांसाठी सर्वाधिक 7 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, अनुसूचित जमातीसाठी 1 व मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी 2 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

अलिबाग तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची चिट्ठी काढण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुसूचित जमाती प्रवर्गात थळ (महिला) आणि रुईशेत-भोमोली (सर्वसाधारण) या गणांचा समावेश आहे. मागास प्रवर्गासाठी रेवदंडा (सर्वसाधारण), आवास (महिला) आणि वरसोली (महिला) या गणांवर आरक्षण निश्चित झाले आहे.

सर्वसाधारण प्रवर्गात रामराज (महिला), चौल (महिला), किहीम (महिला), चेंढरे (महिला), आक्षी (सर्वसाधारण), शहापूर (सर्वसाधारण), काविर (सर्वसाधारण), वैजाळी (सर्वसाधारण) आणि आंबेपुर (सर्वसाधारण) या गणांचा समावेश आहे.

यंदाच्या आरक्षणामुळे अलिबाग पंचायत समितीत महिलांचे प्रतिनिधित्व लक्षणीय प्रमाणात वाढणार असून, स्थानिक राजकारणात महिलांचा सहभाग अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, काही उमेदवारांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या असल्या तरी काहींसाठी हे आरक्षण अनपेक्षित संधी घेऊन आले आहे.

कार्यक्रमात मयुरी महाडिक यांनी आरक्षणाच्या चिट्या काढल्या. चिट्ठ्या उघडताच काहींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, तर काहींनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सभागृहात आनंद आणि हळहळ यांचे मिश्र वातावरण निर्माण झाले होते. राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हे आरक्षण अलिबाग तालुक्यातील निवडणुकीच्या रणधुमाळीला नवे वळण देईल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande