लातूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)काळाच्या ओघात पोलिसांच्या कामाचे स्वरुपही बदलत आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या मजबूत व कणखर असणे आवश्यक आहे. तणावमुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा स्पर्धा हाच योग्य पर्याय असल्याचे मत श्री. संजय भारुका (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर) यांनी व्यक्त केले आहे.तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रंसगी ते बोलत होते.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे मार्गदर्शनात तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा बाभळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडला. या स्पर्धेसाठी पोलीस मुख्यालय, चाकूर उपविभाग, अहमदपूर उपविभाग, निलंगा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनचे पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
आज इतर विभागापेक्षा पोलीस विभागावर मोठी जबाबदारी असल्याने प्रत्येक युनिफॉर्म मधील अधिकारी व कर्मचारी यांनी लोकशाही, जनतेप्रती एकनिष्ठ राहून कर्तव्य पार पाडावे असेही संजय भारुका यांनी सांगितले. फूटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कब्बडी तसेच धावणे, गोळाफेक, लांबउडी, भाला फेक, थाळी फेक, तायक्वांदो आदी स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत चाकूर, अहमदपूर, निलंगा उपविभाग व पोलीस मुख्यालय या चार विभागांचे संघ सहभागी होते. पोलीस मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. उत्कृष्ठ महिला खेळाडू व पुरुष खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, श्री पारसनाथ (कमांडर सी.आर.पी.एफ.) श्री. विशाल कोरे (सी.आर.पी.एफ. असिस्टंट कमांडर) अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस उपाधीक्षक गृह मेत्रेवार, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शाखाप्रमुख, नागरिक उपस्थिती होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis