प्रभाग रचनेतील बदलांकडे सोलापूरकरांचे लक्ष
सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे, यामुळे आता सर्वांचे लक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे लागले आहे. अंतिम प्रभाग रचनेत कोणते बदल होणार? कोणते प्रभाग कायम राहतील? कोणत्या प्रभ
smc


सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।

सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे, यामुळे आता सर्वांचे लक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे लागले आहे. अंतिम प्रभाग रचनेत कोणते बदल होणार? कोणते प्रभाग कायम राहतील? कोणत्या प्रभागामध्ये राजकीय समीकरणे बदलणार? यावर शहरातील आगामी निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल.

महापालिका संकेतस्थळ आणि कौन्सिल हॉल सभागृहाशेजारी ही अंतिम प्रभाग रचना नागरिकांना पाहता येणार आहे. महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर ३८ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यानंतर २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान त्या संदर्भातील शिफारशी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी नगरविकास विभागास पाठवल्या, तर २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम अहवाल सादर करण्यात आला.

शेवटच्या दिवशी शहरातील विविध प्रभागातून १६ हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. विशेष म्हणजे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी शहरातील अनेक प्रभागांसंदर्भात मुद्देनिहाय हरकती सादर केल्या आहेत. या हरकतींमध्ये लोकसंख्येतील वाढ (९.५ लाखांवरून १२.५ लाखांपर्यंत), प्रभागातील असमतोल मतदारसंख्या, हद्दवाढ भागावरील अन्याय, राजकीय हेतूचा संशय, तसेच सिंगल वॉर्ड प्रणालीची मागणी यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. शहरातील माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, चंद्रकांत सोनवणे, समीर शेख, अमोल जगताप, रियाज मोमीन, मिलिंद क्षीरसागर, अंजली वलसा, नटराज कांबळे, मनीष गायकवाड आदींनी देखील आपली हरकत नोंदविली आहे. आता सर्वांचे लक्ष अंतिम प्रभाग रचनेकडे लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande