रायगड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। म्हसळा तालुक्यातील मौजे नेवरुळ गावातील ग्रामस्थांना दिलासा देणारी आनंदवार्ता समोर आली आहे. रोजगार हमी व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून गावातील विहीर दुरुस्ती साठी तब्बल १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी माजी सभापती रविंद्र लाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांना या संदर्भात निवेदन दिले होते. नेवरुळ गावालगत असलेली ही विहीर दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्याने तिचा कठडा तुटला व विहीर धोकादायक अवस्थेत पोहोचली होती. गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचा हा प्रमुख स्त्रोत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.निवेदनाची दखल घेत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करून दिला. या निधीच्या मदतीने लवकरच विहीर दुरुस्तीचे काम सुरू होणार असून गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.ग्रामस्थांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांचे मनःपूर्वक आभार मानले असून त्यांच्या पुढाकारामुळे नेवरुळ गावाला सुरक्षित व सुस्थितीत पाणीपुरवठा मिळणार असल्याचे समाधान व्यक्त केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके