लातूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।मराठवाड्याच्याा सामाजिक पटलावर एका अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायक घटनेची नोंद झाली आहे. जेव्हा अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान केले, अनेकांची आयुष्ये कोलमडली, तेव्हा उदगीर नगरीतील समाजसेवी संस्थांनी एकजुटीची खरी ताकद दाखवून दिली.
उदगीर येथील गोरक्षण संस्थेने या संकटाच्या काळात केवळ सहानुभूती व्यक्त न करता, मदतीचा एक नवा आणि कृतिशील आदर्श समोर ठेवला. संस्थेच्या वतीने एका हृद्य समारंभात, पूरग्रस्त भागातील सोळा गरजू शेतकरी कुटुंबांना गोधनाचे वितरण करण्यात आले. हे केवळ पशुधन नाही, तर त्यांच्या तुटलेल्या संसाराला पुन्हा उभे करण्यासाठी दिलेला एक मोठा आधार आहे.
विशेष म्हणजे, हा भव्य उपक्रम केवळ एका संस्थेचा नव्हता. रोटरी क्लब, संघर्ष मित्रमंडळ, लायन्स क्लब आणि अन्य सामाजिक संस्थांनी खांद्याला खांदा लावून काम केले. या सामूहिक प्रयत्नातून आणि उदगीरच्या दानशूर नागरिकांच्या सहभागातून तब्बल दहा लाख रुपयांहून अधिक निधी जमा झाला. समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मराठवाड्याच्या समाजसेवेत हा उपक्रम आज एक नवा 'पॅटर्न' म्हणून ओळखला जात आहे.
या सोहळ्याला आमदार संजय बनसोडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार बनसोडे यांनी उदगीरच्या संस्थांनी दाखवलेल्या एकजुटीचे आणि संवेदनशीलतेचे भरभरून कौतुक केले. त्यांनी स्पष्ट केले, की लातूर जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण मराठवाड्यात हा उपक्रम निश्चितच आगळावेगळा आणि अनुकरणीय आहे.
उदगीरकरांनी दाखवलेली ही सामाजिक संवेदनशीलता आणि संघटित एकोपा... ही केवळ पूरग्रस्तांना दिलासा देणारी घटना नाही, तर संपूर्ण मराठवाड्याच्या सामाजिक जीवनात उत्साह आणि आशेचा एक नवा आणि तेजस्वी किरण ठरली आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis