अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)
अमरावती महानगरपालिकेतर्फे १६ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात येणाऱ्या “दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन” या भव्य उपक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज १३ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक भवनाला भेट देऊन सखोल पाहणी केली.
पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित अधिकारी, अभियंते आणि विभाग प्रमुखांशी संवाद साधून नियोजनाची माहिती घेतली. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत सुरक्षा, स्वच्छता, प्रकाशयोजना, वाहतूक व पार्किंग व्यवस्था याबाबत स्पष्ट व महत्वाचे निर्देश दिले.आयुक्त म्हणाल्या, “हा उत्सव केवळ एक सांस्कृतिक उपक्रम नसून, तो शहरातील कला, संस्कृती आणि सामाजिक एकतेचं प्रतीक ठरेल. त्यामुळे नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सर्वसमावेशक व्हावा.”
उत्सवाची वैशिष्ट्ये
या आनंदोत्सवात फोटोग्राफी प्रदर्शनात शहरातील छायाचित्रकारांच्या उत्कृष्ट कलाकृती, बचत गटांचे स्टॉल्स, स्थानिक उद्योजकांची उत्पादने, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच मुलांसाठी मनोरंजनपर उपक्रम हे विशेष आकर्षण ठरणार आहेत.
महानगरपालिकेच्या या उपक्रमात “विधिमंत्र संस्था” सहसंयोजक म्हणून सहभागी झाली असून, व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावेळी परिसर आकर्षक पद्धतीने सजविणे, सुरक्षितता उपाययोजना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहनतळाची सुविधा याबाबतही सूचना दिल्या.यावेळी उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, धनंजय शिंदे, बाजार परवाना विभागाचे दिपक खडेकार, उदय चव्हाण, NULM विभागाचे व्यवस्थापक भूषण बाळे, देवदत्त कुलकर्णी, सांस्कृतिक भवनचे व्यवस्थापक व कार्यक्रम संयोजक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी