शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटींचे नुकसान
अमेरिका-चीन संघर्षाचे जागतिक बाजारावर पडसाद रुपया आणि कच्च्या तेलाच्या दरातही घसरण मुंबई, १४ ऑक्टोबर (हिं.स.) : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाली. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या संघर्षामुळ
शेअर बाजार लोगो


अमेरिका-चीन संघर्षाचे जागतिक बाजारावर पडसाद

रुपया आणि कच्च्या तेलाच्या दरातही घसरण

मुंबई, १४ ऑक्टोबर (हिं.स.) : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाली. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या संघर्षामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली असून, मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) निर्देशांकात तब्बल 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी, सेन्सेक्स 297 अंकांनी घसरून 82.029 वर स्थिरावला, तर निफ्टी 81 अंकांनी खाली येऊन 25.145 वर पोहोचला. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात ही घसरण नोंदवण्यात आली. स्मॉल आणि मिडकॅप निर्देशांकांतही अनुक्रमे 0.9 टक्के आणि 0.8 टक्के घट झाली आहे.

तेलाच्या किमती आणि रुपयात अस्थिरता

अमेरिका-चीन संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.

⦁ ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल $1.01 (1.6%) नी घसरून $62.31 वर आले.

⦁ यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूडचे दर $0.95 नी घसरून $58.54 वर पोहोचले – हे दर मागील पाच महिन्यांतील नीचांक ठरले आहेत.

याच संघर्षाचा परिणाम चलन बाजारावरही दिसून आला. रुपयात कमजोरी आढळली असून, डॉलरच्या तुलनेत रुपया 88.79 रुपये प्रति डॉलर इतका घसरला. तथापि, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे अधिक घसरण रोखण्यात यश आले.

गुंतवणूकदारांमध्ये निराशा, अस्थिरतेचे वातावरण

अंतरराष्ट्रीय घडामोडी आणि व्यापारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. विशेषतः स्मॉल आणि मिडकॅप शेअर्समध्ये झालेली घसरण ही गुंतवणुकीच्या धोरणांवर परिणाम करू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक बाजारातील उलथापालथीचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला असून, पुढील काही दिवस हे बाजारासाठी निर्णायक ठरणार आहेत. अमेरिका-चीन संबंधांमध्ये सुधारणा न झाल्यास ही अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande