मुंबई, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदाने वेड लावणारा अभिनेता ओंकार भोजने पुन्हा एकदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर परतला आहे आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे! सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून ओंकार घराघरात पोहोचला. त्याच 'अगं अगं आई...' म्हणणारा ओंक्या हे पात्र असो वा 'हा इथे काय करतोय' विचारणाऱ्या मामा ची भूमिका... भोजने ने आपल्या विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ओंकारने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मधल्या काळात त्याने शोमधून ब्रेक घेतला होता, ज्यामुळे त्याचे चाहते काहीसे नाराज झाले होते. सोशल मीडिया द्वारे प्रेक्षकांनी त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये परत येण्यासाठी बराच काळ मागणी केली. आणि प्रेक्षकांच्या या मागणीला मान देत ओंकार भोजने पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात परत येत आहे.
ओंकार ने पुन्हा हास्यजत्रेच्या शूटिंग ला सुरवात केली आहे. सोनी मराठी वाहिनीने नवा प्रोमो दाखविला आहे त्यात ओंकारला पुन्हा पाहून प्रेक्षक आनंदी झाले आहेत. प्रोमोमध्ये ओंकारच्या खास शैलीतील मामाचे पात्र साकारले आहे या पत्राने आणि मामांच्या संवादाने सर्वांचे लक्ष वेधले. ओंकारच्या या 'घरवापसी'मुळे प्रेक्षकांच्या प्रेमाचा आणि कौतुकाचा पाऊस नक्कीच पडणार आहे.
हास्यजत्रा हे माझे प्रेम आहे असे ओंकार चे नेहमी म्हणणे आहेच. ओंकारचे परत येणे म्हणजे 'हास्यजत्रा'च्या विनोदाची पातळी आणखी वाढणार हे निश्चित. महाराष्ट्राची हास्यजत्रा या सीजन मध्ये त्याच पुनरागमन होत आहे म्हणजेच ऐन दिवाळीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा दुप्पट बोनस मिळणार हे नक्की. नम्रता संभेराव, समीर चौगुले, नम्रता संभेराव आणि वनिता खरात यांच्यासोबत ओंकारची जुगलबंदी पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते.
त्यामुळे, प्रेक्षकांची लाडकी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता ओंकार भोजनेच्या दमदार एन्ट्रीने आणखी रंगतदार होणार आहे. सज्ज व्हा, कारण आता हसून हसून पोट दुखायला लावणाऱ्या या 'कोकण कोहिनूर'ची धमाल पुन्हा सुरू झाली आहे!
महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या मंचावर घुमणार 'अगं अगं आई... ओंकार चा आवाज. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा विनोदाचा बोनस सोमवार ते बुधवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर