नाशिक, 14 ऑक्टोबर, (हिं.स.) : युगप्रवर्तक कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज बुधवारी (ता. १५) नाशिकमध्ये नारायण सुर्वे साहित्य संमेलन होत आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उदघाटन करतील. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे अध्यक्षस्थानी असतील. सिडकोमधील सिंहस्थनगरच्या राजे संभाजी स्टेडियम शेजारील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयात साहित्य संमेलन येथे होत आहे. सकाळी नऊ वाजता अभिवादन यात्रा निघेल. संमेलनाचे उदघाटन सकाळी दहाला होईल.
यावेळी 'नवी सनद' च्या विशेषांकाचे, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या 'नाशिक तू एक सुंदर कविता' चे आणि कवी रविकांत शार्दूल यांच्या 'गवसले आकाश नवे' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी महाराष्ट्र मधील साहित्यिकांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. डॉ. कसबे हे प्रमुख पाहुणे असतील. कांबळे अध्यक्षस्थानी असतील. कवी अरुण नाईक, कादंबरीकार सुरेश पां शिंदे, कथासंग्रहकार डॉ अजितसिंह चाहल, बालकवी प्रसेनजित गायकवाड यांचा सन्मानार्थीमध्ये समावेश आहे. कविसंमेलनाने साहित्य संमेलनाची सांगता होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV