* मुख्यमंत्री, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
* तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर
पणजी, १५ ऑक्टोबर (हिं.स.) : गोव्याचे कृषीमंत्री आणि दोन वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेल्या रवी नाईक यांचे आज, बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. कार्डिॲक अरेस्टमुळे नाईक यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. नाईक यांना तातडीने फोंडा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत शोकभावना व्यक्त करताना म्हणाले की, रवी नाईक हे गोव्याच्या राजकारणातील एक मोठे नेते होते. त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्री म्हणून अनेक वर्षे राज्याची सेवा केली. त्यांच्या कार्याचा राज्याच्या प्रशासनासह जनतेवर खोलवर ठसा उमटला आहे. नाईक यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
रवी नाईक हे भंडारी समाजाचे नेते म्हणून ओळखले जात होते. ज्या मतदारसंघात भंडारी समाजाची मोठी लोकसंख्या आहे, तिथे त्यांचा मोठा प्रभाव होता. 'कुल' आणि 'मुंडकार' यांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे आंदोलन केले होते. १९९१ मध्ये रवी नाईक यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी सुमारे २८ महिने हे पद सांभाळले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली होती.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पोंडा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून झाली. १९८४ मध्ये त्यांनी महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीच्या (मगोपा) तिकिटावर फोंडा मतदारसंघातून आमदार म्हणून पहिल्यांदा निवडणूक जिंकली. पुढे १९९८ मध्ये ते उत्तर गोव्यातून काँग्रेसचे खासदार म्हणूनही निवडून आले.
ऑक्टोबर २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विविध पक्षांच्या आमदारांना एकत्र आणून सरकार स्थापन केले, तेव्हा रवी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या युती सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. मात्र, २००२ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २००७ मध्ये, नाईक यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून पक्षाला सरकार स्थापन करण्यास मदत केली. दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये त्यांनी पाच वर्षे गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.
२०२१ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा भाजपामध्ये प्रवेश केला. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पोंडा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भाजपसाठी हा मतदारसंघ पहिल्यांदा जिंकून दिला. त्यानंतर ते सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत नाईक यांना श्रद्धांजली वाहिली. “गोवा सरकारमधील मंत्री रवी नाईक जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. गोव्याच्या विकासाच्या मार्गाला समृद्ध करणारे अनुभवी प्रशासक आणि समर्पित लोकसेवक म्हणून त्यांचे स्मरण केले जाईल. ते विशेषतः वंचित आणि उपेक्षितांना सक्षम करण्यासाठी उत्सुक होते. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांना माझी संवेदना. ओम शांती.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी