मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.) - निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांमध्ये मोठे घोळ आहेत. या सगळ्याची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला दिली आहे. परंतु, राज्य निवडणूक आयोग हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवत आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोग संबंधित काम राज्य निवडणूक आयोगाकडे असल्याचे सांगत आहे. गेल्या ५ वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, अजून ६ महिने निवडणुका लांबल्या तरी अडचण काय. सत्तेतील तीन पक्षांसाठी निवडणूक आयोग काम करत नाही. मतदार यादीमुध्ये घोळ असेल, तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयास याबाबत सांगा की, आम्ही निवडणूक घेण्यास तयार नाही. मतदार याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करु. मतदार यादीतील घोळामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द करा, अशी आग्रही मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे आणि मविआ शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
राज ठाकरे म्हणाले की, मतदार हा गोपनीय कसा असेल, तुम्ही याद्या जाहीर करता. मतदान गोपनीय असते. निवडणूक आयोगाचा घोळ काही कळत नाही. २०२२ च्या याद्या नाव आणि फोटोंसह आहेत आणि आताच्या याद्यांमध्ये फोटो काढून टाकले आहेत. हे सगळे निवडणूक आयोग करत आहे आणि ते हे का करत आहेत. याच आणि एकूणच सर्व घोळ निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आणि बुधवारी पुन्हा राज्यासह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोग हे फक्त निवडणुका घेतात, कंडक्ट करतात. परंतु, राजकीय पक्ष प्रत्यक्ष निवडणुका लढवतात. परंतु, निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवतच नसतील, तर पहिलाच घोळ इकडे आहे. आम्ही तुम्हाला याद्याच दाखवणार नाहीत, असे सांगत २०२४ च्या निवडणुका व्हायच्या आधी आणि नंतर अशा दोन याद्या राज ठाकरे यांनी दाखवल्या.
२०२४ मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यातील तपशील सांगतो. त्यामुळे यादीत काय प्रकारचा घोळ आहे, ते समजेल. मतदारसंघ १६० कांदिवली पूर्व नाव धनश्री कदम, वय -२३, वडिलांचे नाव दीपक कदम, वय - ११७, मतदारसंघ १६१ चारकोप, नंदिनी चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय - १२४, महेंद्र चव्हाण यांच्या वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय ४३ कोणी कोणाला काढले तेच कळत नाही, असे राज ठाकरे यांनी सांगताच एकच हशा पिकला. तसेच २०२४ नंतर निवडणूक आयोगाने जी मतदारयादी जाहीर केली, त्यात फक्त नावे येत आहेत. यापूर्वी ज्या मतदारयाद्या येत होत्या, त्यात नावे, पत्ता आणि फोटो सगळेच येत होते, याकडेही राज ठाकरेंनी लक्ष वेधले.
दरम्यान, आम्ही भेटल्यानंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना नोटिफिकेशन काढून ८ दिवसांची मुदत दिली. हे नोटिफिकेशन रद्द करावे आणि योग्य मुदत द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. तुम्ही दुरुस्तीसाठी ६-६ महिने घेणार आणि आम्ही ८ दिवसांत छाननी करून द्यायची, हे शक्य नाही. निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेते, हे आम्ही पाहतो आणि यानंतर सर्व पक्षांचा काय निर्णय होतो, ते आम्ही कळवतो. मतदारयाद्यांच्या बाबतीत राजकीय पक्षांचे समाधान व्हावे. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले, अशी माहिती ठाकरेंनी दिली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात ८ टर्म ८०-९० हजार मतांनी निवडणूक जिंकतात, यंदा लाखाने पडले, हे कसे शक्य आहे, असा सवालही त्यांनी केला.
निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही - उद्धव ठाकरे
निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही, असे सुनावत सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा, असे मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मतदार याद्यांमध्येच त्रुटी असतील तर निवडणुका कशाल घेता, डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका. मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोग म्हणतं ही आमची जबाबदारी नाही मग, आम्ही कोणाशी बोलायचे. तुम्ही जबाबदारी घेत नाही, व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाही, म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल. असा टोलाही त्यांनी लगावला.
...तर निवडणूक आयोग उत्तर देत नाही - जयंत पाटील
आम्ही अर्ज केला, जाब विचारलं तर निवडणूक आयोग उत्तर देत नाही, अशी खंत व्यक्त करत यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मतदार यादींमध्ये त्रुटींचे पुरावे निवडणूक आयोगासमोर ठेवले. अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीरमधील मतदार आहे. त्याचा कोणता ठावठिकाणा नाही. मतदार यादी सकाळी नाव असते आणि बातम्यांवर आले तर ते संध्याकाळी डिलीट कसं होतं, आम्ही सगळे पुरावे दिले, ते तुम्हाला पटत आहेत ना ? या प्रश्नांवर आम्ही मतदार यादी तपासतो, असे निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी सांगितले.
निवडणूक पारदर्शक कशी होणार? - वडेट्टीवार
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देवांग दवे कोण आहे, याची माहिती घ्या. हा माणूस भाजपाचा आहे, हा निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो, असा आरोप करत मतदार यादीत प्रचंड घोळ असेल तर निवडणूक पारदर्शक कशी होणार?, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी