कुरनूलमध्ये करणार 13,430 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते नंदयाल जिल्ह्यातील श्रीशैलम येथील श्री भ्रामराम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा व दर्शन करतील. त्यानंतर दुपारी ते श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट देतील.
यानंतर पंतप्रधान कुरनूल येथे जातील, याठिकाणी ते 13 हजार 430 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. या कार्यक्रमादरम्यान ते जनसभेलाही संबोधित करतील.
पंतप्रधान मोदी श्री भ्रामराम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा-अर्चना करतील. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 52 शक्तिपीठांपैकी एक आहे. या मंदिराची खास वैशिष्ट्ये म्हणजे एका मंदिराच्या आवारात ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ यांचे सहअस्तित्व आहे ज्यामुळे हे मंदिर देशातील एकमेव आणि अद्वितीय तीर्थस्थान ठरते.
श्रीशैलम येथील शिवाजी स्फूर्ती केंद्र हे ध्यानमंदिरासह एक स्मारक संकुल आहे. या ध्यानमंदिराच्या चार कोपऱ्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित 4 नामांकित प्रतापगड, राजगड, रायगड आणि शिवनेरी किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारलेल्या आहेत. मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची ध्यानमग्न अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. हे केंद्र श्री शिवाजी स्मारक समितीद्वारे चालवले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1677 मध्ये श्रीशैलमच्या ऐतिहासिक यात्रेच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आली आहे.
कुरनूल येथे पंतप्रधान मोदी 13.430 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे शिलान्यास, उद्घाटन आणि लोकार्पण करतील.
हे प्रकल्प उद्योग, वीज प्रसारण, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू या प्रमुख क्षेत्रांशी संबंधित आहेत. हे प्रकल्प प्रदेशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याबरोबरच औद्योगिकीकरणाला गती देणार असून, राज्याच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासाविषयी केंद्र सरकारची वचनबद्धता दर्शवतात.
याशिवाय, पंतप्रधान मोदी कुरनूल-III पूलिंग स्टेशनवरील प्रसारण प्रणाली सुदृढीकरण प्रकल्पाची पायाभरणी करतील. हा प्रकल्प 2880 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा असून, यात 765 केव्ही डबल-सर्किट कुरनूल-III पूलिंग स्टेशन-चिलकलुरिपेटा प्रसारण लाइन उभारणीचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे 6 हजार मेगाव्हॅटपर्यंत रूपांतरण क्षमता वाढेल, नवीकरणीय ऊर्जेचे मोठ्या प्रमाणावर प्रसारण शक्य होईल आणि देशाच्या विकासाला चालना मिळेल.
पंतप्रधान मोदी कुरनूलमधील ओर्वकल औद्योगिक क्षेत्र आणि कडप्पा जिल्ह्यातील कोप्पर्थी औद्योगिक क्षेत्राच्या पायाभरणीचा समारंभही करतील. या दोन्ही प्रकल्पांमध्ये एकत्रितपणे 4920 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार असून, त्यातून 21 हजार कोटी रुपयांचे पुढील गुंतवणूक आकर्षित होईल आणि सुमारे 1 लाख रोजगारनिर्मितीची अपेक्षा आहे. या उपक्रमांमुळे आंध्र प्रदेशातील रायलसीमा प्रदेशातील औद्योगिक विकास आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढीस लागेल.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी