नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : गेल्या 11 वर्षात भारतीय रेल्वेने गेल्या 11 वर्षात मोठी प्रगती केली असून त्याचे परिणाम आता स्पष्टपणे जाणवत असल्याचे प्रतिपादन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, बुधवारी केले. नवी दिल्ली येथे आयोजित इंटरनॅशनल रेल्वे इक्विपमेंट एक्झिबिशनमध्ये बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या 11 वर्षांत देशात 35 हजार किलोमीटर रेल्वे रूळांचे जाळे तयार करण्यात आले आहे. तसेच 46 हजार किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे.गेल्या 11वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेच्या आधुनिकीकरणावर विशेष भर दिला असून आज त्याचे भव्य परिणाम आपल्या समोर आहेत. या कालावधीत 40 हजार नवीन रेल्वे कोच तयार करण्यात आले आहेत, जे भारताची तांत्रिक आणि उत्पादन क्षमता दर्शवतात असे वैष्णव यांनी सांगितले. या सर्व उपलब्धी भारतीय रेल्वेमधील परिवर्तन आणि एक आधुनिक, टिकाऊ व प्रवासी-केंद्री परिवहन प्रणाली उभारण्याच्या दृष्टीने सरकारच्या दूरदर्शी दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत.देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की, या प्रकल्पावर वेगाने काम सुरू आहे आणि आतापर्यंत 325 किलोमीटरचा बांधकामाचा टप्पा पूर्ण झाला आहे. “मी नुकतीच सूरत आणि मोरा स्थानकांना भेट दिली. हे स्थानक 2027 मध्ये उघडण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा भाग असतील,” असे त्यांनी सांगितले. सध्या भारतात 156 वंदे भारत सेवा, 30 अमृत भारत सेवा आणि 4 नमो भारत सेवा चालू आहेत, ज्या प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरत आहेत.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रेल्वे मंत्री वैष्णव यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे (सीआयआय) आभार मानले आणि सुचवले की भारताने आता एक जागतिक दर्जाचे रेल्वे प्रदर्शन आयोजित करावे, जे जर्मनीतील InnoTrans पेक्षाही मोठे असावे.भारताला एका भव्य रेल्वे परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी सीआयआयला विनंती करतो की, रेल्वेच्या सर्व क्षेत्रांना तंत्रज्ञान, डिझाईन, सॉफ्टवेअर आणि हाय-स्पीड नेटवर्क या प्रदर्शनात सामावून घ्या असे आवाहन त्यांनी केले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी