जळगाव, 16 ऑक्टोबर (हिं.स.) मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरातील भोकरी भागात अवैध गौण खनिज वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत दोन डंपर आणि एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आली आहे. तहसीलदार गिरीश वखारे यांना रात्रीच्या वेळी अवैध गौण खनिज वाहतुकीची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पथक तयार केले. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मिळून भोकरी परिसरात छापा टाकला. यावेळी अंतुर्ली आऊट पोस्टचे हवालदार आणि पोलिस कर्मचारीही उपस्थित होते.
महसूल पथकाने घटनास्थळावरून दोन डंपर आणि एक जेसीबी मशीन ताब्यात घेतली. ही सर्व वाहने सध्या अंतुर्ली आऊट पोस्ट पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. जप्त वाहनांपैकी एक डंपर आणि जेसीबी ही विजय दिनकर पाटील (रा. भोकरी, ता. मुक्ताईनगर) यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या डंपरवर नंबर प्लेट नसल्याने त्याचे आरसी बुक मागवण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार गिरीश वखारे यांनी दिली. या कारवाईमुळे भोकरी परिसरातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला मोठा आळा बसणार असल्याचे स्थानिकांनी व्यक्त केले. अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाच्या या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर