रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या पोलिस कोठडीत झालेल्या अकस्मात मृत्यूसंदर्भात रायगड पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष वंदना मोरे यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून, लवकरच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन प्रकरणाची तपासणी करण्याचे ठरवले आहे.
वंदना मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “भूषण पतंगेच्या कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही, मात्र चौकशीदरम्यान आरोपीचा मृत्यू होणे अत्यंत गंभीर आहे. पोलिसांना त्याची वैद्यकीय माहिती होती, तरीही त्यांनी मेडिकल कस्टडी न घेता कोठडीची मागणी का केली?”
३ ऑक्टोबर २०२५ रोजी अलिबाग येथील पतंगेच्या घरावर छापा टाकला असता बनावट नोटांचा कारखाना सापडला. पोलिसांनी लाखो रुपयांच्या नोटा जप्त केल्या. ४ ऑक्टोबरला पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. तथापि, चौकशीदरम्यान पतंगेची तब्येत अचानक बिघडली आणि त्याला अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान दोन दिवस शिल्लक कोठडी असताना त्याचा मृत्यू झाला.
मोरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले. “जर त्याला फिट्सचा आजार होता, तर पोलिसांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली चौकशी का केली नाही?” त्यांनी पोलीस व्यवस्थेवर गंभीर शंका व्यक्त केली आणि कुटुंबीयांसोबत भेटून न्याय मिळावा, अशी मागणी केली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक आंचाल दलाल यांनी या प्रकरणात पोलिस त्यांच्या पद्धतीने काम करत असल्याचे एक ओळीचे विधान केले आहे. या प्रकरणामुळे रायगड पोलिसांवर संशयाचे सावट पसरले असून, स्वतंत्र चौकशीची मागणी जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके