नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (हिं.स.) - आयुर्वेद आहार म्हणजे केवळ अन्न नसून, ते आरोग्य, शाश्वतता आणि निसर्गाशी साहचर्य साधणारे तत्वज्ञान आहे. मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातील परस्पर सहकार्यपूर्ण भागिदारीतून सरकारने आयुर्वेद आहाराला जागतिक पोषण व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे उत्तम अन्नाच्या माध्यमातून उत्तम आणि रोगमुक्त भविष्याच्या दिशेची वाटचाल सुनिश्चित होईल, असे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. या वर्षाच्या जागतिक अन्न दिनाची संकल्पना भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जुळणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आज जगभरात जागतिक अन्न दिवस 2025 साजरा केला जात आहे. उत्तम अन्न आणि उत्तम भविष्यासाठी परस्परांना साथ (Hand in Hand for Better Foods and a Better Future) ही यंदाच्या जागतिक अन्न दिनाची संकल्पना आहे. या निमित्ताने आयुष मंत्रालयाने आयुर्वेद आहार हा अभिनव उपक्रम राबवत आरोग्यदायी आणि अधिक शाश्वत पृथ्वीच्या निर्मितीप्रती भारताची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. हा उपक्रम समतोल, आरोग्य आणि निसर्गाशी जोडलेल्या भारताच्या खाद्य तत्त्वज्ञावर आधारीत आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने आयुष मंत्रालयासोबतच्या सल्लामसलती अंतर्गत श्रेणी अ अंतर्गत आयुर्वेद आहार म्हणून निश्चित केलेल्या उत्पादनांची एक यादी अलिकडेच प्रसिद्ध केली. यामुळे अस्सल आयुर्वेदिक आहाराच्या तयारीसाठी पहिली सर्वसमावेशक संदर्भ चौकट उपलब्ध झाली आहे. ही यादी मान्यताप्राप्त शास्त्रीय ग्रंथांवर आधारित आहे. यामुळे आयुर्वेद आधारित पोषणातील प्रगती, गुणवत्ता आणि यावरच्या जागतिक आत्मविश्वासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे अधिसूचित केलेल्या आयुर्वेद आहार विषयक नियमनाच्या माध्यमातून, भारताच्या पारंपरिक आरोग्य ज्ञानाचे आधुनिक अन्न सुरक्षा मानकांसह एकात्मिकीकरण घडवून आणण्याच्या बाबतीत नवा मापदंड स्थापित होऊ लागला असल्याचे ते म्हणाले. याच आधारावर आयुर्वेद आहार म्हणून निश्चित केलेल्या उत्पादनांची एक यादी जारी केली असून, या यादीच्या प्रकाशनामुळे ग्राहकांना तसेच खाद्यान्न क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना शास्त्रीय आयुर्वेदिक ज्ञानाशी संबंधित नेमके आणि प्रमाणित संदर्भ उपलब्ध होतील याची सुनिश्चिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनीही या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. आयुर्वेद आधारित खाद्यान्न व्यवस्थेबद्दल जगभरातले स्वारस्य वाढते आहे, यातून समग्र पोषणाच्या क्षेत्रात भारताने दिलेले महत्त्वपूर्ण योगदान ठळकपणे अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले. आता आयुर्वेद आहार म्हणून निश्चित केलेल्या उत्पादनांची यादी जाहीर झाल्याने, आयुर्वेद आहाराचा आराखडा अधिक मजबूत झाला आहे, यामुळे उत्पादकांमध्येही अधिक स्पष्टता येईल, तसेच ग्राहकांमधील विश्वासार्हताही वाढेल असे त्यांनी सांगितले. यामुळे आरोग्य खाद्य क्षेत्रातील स्टार्ट-अप्स तसेच नवोन्मेषालाही मोठी चालना मिळेल, आहार आणि जीवनशैलीशी संबंधित विकारांमुळे होणाऱ्या असंसर्गजन्य रोगांची वाढती साखळी रोखण्यातही आयुर्वेदचे ज्ञान कामी येऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वैविध्यपूर्ण आणि संतुलित आहारयुक्त भारतीय थाळीतून भारताची पारंपरिक खाद्यान्न व्यवस्था समजून घेता येते. या व्यवस्थेच्या पोषण विषयक आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या उपयुक्ततेची आता अवघे जग दखल घेऊ लागले आहे. काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या आयुर्वेदाच्या आहारविषयक ज्ञानावर आधारलेल्या भारताची या आदर्श खाद्यान्न व्यवस्थेत हंगामानुसारच्या खाण्याच्या सवयी, त्यातील घटकांसाठी स्थानिक स्त्रोतांचा संबंध आणि समाधान देणारे सेवन यावर भर दिला गेला आहे आणि ही बाब शाश्वत अन्न व्यवस्थेसाठीच्या जागतिक आवाहनाला अनुसरून असल्याचेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी