नवी दिल्ली , 16 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय वायुदलाने जगातील सर्वात शक्तिशाली वायुदलांपैकी एक होण्याचा मान मिळवला आहे. वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (डब्ल्यूडीएमएमए) च्या क्रमवारीनुसार, अजूनही अमेरिका अव्वल क्रमांकावर आहे. त्यानंतर रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. पूर्वी तिसऱ्या स्थानावर असलेला चीन आता चौथ्या स्थानी गेला आहे, तर भारताने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
भारतीय वायुदलाची ही प्रगती आशियामधील सामरिक संतुलनात मोठा बदल दर्शवते. डब्ल्यूडीएमएमए रँकिंगमध्ये १०३ देशांतील १२९ वायुदलांचा समावेश आहे, ज्यामध्ये लष्कर, नौदल आणि नेव्हल एव्हिएशन ब्रांचचा समावेश आहे.या यादीमध्ये जगभरातील एकूण ४८,०८२ विमानांची पाहणी केली गेली आहे.
सैन्य रणनीतीमध्ये वायुदल ही एक निर्णायक भूमिका बजावणारी शक्ती मानली जाते. या क्षेत्रात अमेरिका TruVal Rating (टीव्हीआर) 242.9 सह आघाडीवर आहे. अमेरिकन नौदल दुसऱ्या क्रमांकावर असले तरी देशाच्या दृष्टीने अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. रशिया दुसऱ्या स्थानावर असून त्याचा TVR 142.4 आहे. भारतीय वायुदलाचा TruVal Rating (टीव्हीआर) 69.4 आहे. ही रेटिंग केवळ विमानांची संख्या नव्हे, तर आक्रमण आणि संरक्षण क्षमता, सैन्य सहाय्य, आधुनिकीकरण, आणि ऑपरेशनल ट्रेनिंग यासारख्या बाबींचा विचार करते.
भारताकडे १,७१६ विमानांचा ताफा आहे, ज्यामध्ये, ३१.६% लढाऊ विमाने, २९% हेलिकॉप्टर्स आणि २१.८% ट्रेनर विमाने आहेत. भारताचे अनेक लढाऊ आणि सहाय्यक उपकरणे अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्रायल या देशांतून आलेली आहेत. मे २०२५ मध्ये भारताने “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या कारवाईत पाकिस्तानचे किमान १२ हवाई तळ आणि रडार स्टेशन्स उद्ध्वस्त झाले. पाकिस्तानला उत्तर देण्याची संधीही मिळाली नाही, यावरून भारतीय वायुदलाची कार्यक्षमता दिसून आली.
चिनी वायुदलाचा TruVal Rating (टीव्हीआर) 63.8 असून तो आता चौथ्या स्थानावर आहे. चीन तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बॉम्बर्स आणि आधुनिक युनिट्समध्ये मोठा गुंतवणूक करत आहे, परंतु तरीही भारताने केवळ ताफ्याच्या आकारावर भर न देता, त्याच्या गुणवत्ता, विविधता आणि रणनीतिक क्षमतांवर भर दिला, यामुळे भारताने आघाडी घेतली.
भारतीय वायुदलाने गेल्या काही वर्षांत राफेल, सुखोई Su-30MKI चे अद्ययावत व्हर्जन्स, ड्रोन्स, निगराणी विमाने आणि एरोनॉटिकल अपग्रेड प्रोजेक्ट्स यांचा समावेश करून स्वतःला अपग्रेड केलं आहे. हे विमान फक्त जुन्या तंत्रज्ञानावर आधारित नाहीत, तर पूर्णपणे आधुनिक आहेत, ज्यामुळे TVR मध्ये वाढ झाली आहे. भारतीय वायुदलाने फक्त लढाऊ विमानांवर भर न देता, लढाऊ, वाहतूक, निगराणी, हेलिकॉप्टर, ड्रोन अशा सर्व प्रकारचे विमाने ताफ्यात समाविष्ट केली आहेत. ही विविधता टीव्हीआर सुधारण्यात मदत करते. त्याचप्रमाणे, वायुदलाने स्पेअर पार्ट्सचा पुरवठा, देखभाल सुविधा आणि सप्लाय चेन सुधारून आपली ऑपरेशनल क्षमता वाढवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode