नवी दिल्ली , 16 ऑक्टोबर (हिं.स.)। श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिनी अमरसूर्या या आज, गुरुवारी दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यानिमित्त भारतात दाखल झाल्या. पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे, जो १८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या दौऱ्यात अमरसूर्या भारतातील वरिष्ठ राजकीय नेत्यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील.
भारतात आगमनानंतर अमरसूर्यांचे स्वागत उच्चस्तरीय पातळीवर करण्यात आले. त्या दिल्लीतील केंद्र सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी भेटीगाठी करतील. या बैठकींमध्ये रणनीतिक, आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा होईल, ज्यामुळे भारत-श्रीलंका संबंध अधिक मजबूत होतील.
आपल्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान अमरसूर्या नवी दिल्लीत होणाऱ्या ‘एनडीटीव्ही वर्ल्ड समिट’ मध्ये सहभागी होतील, ज्याचे आयोजन एनडीटीव्ही आणि चिंतन रिसर्च फाउंडेशन यांनी संयुक्तरित्या केले आहे. या मंचावर त्या मुख्य भाषण देतील, ज्यामध्ये त्या भारत-श्रीलंका संबंध, जागतिक आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर आपले विचार मांडतील.
श्रीलंकन पंतप्रधानांकडे देशाच्या शिक्षण खात्याची जबाबदारी देखील आहे. त्यामुळे भारत दौऱ्यात त्या शिक्षण व तांत्रिक सहकार्याच्या क्षेत्रात देखील संधी शोधतील. त्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्ली आणि नीती आयोगाला भेट देतील, जिथे त्या भारताच्या नवप्रवर्तन मॉडेल, स्टार्टअप धोरण, आणि डिजिटल परिवर्तनाच्या रणनीतींविषयी माहिती घेतील.
हरिनी अमरसूर्यांचा भारताशी वैयक्तिक संबंध देखील आहे. त्या दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत. या खास प्रसंगी त्या आपल्या जुन्या कॉलेजला भेट देतील. कॉलेज प्रशासनाने त्यांच्या स्वागतासाठी खास कार्यक्रमांची मालिका आखली आहे.या दौऱ्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापार व आर्थिक सहकार्य बळकट करणे. पंतप्रधान अमरसूर्या व्यापारी परिषदेमध्ये (बिझनेस मिटिंग) सहभागी होतील, जिथे द्विपक्षीय व्यापार संबंध वाढवण्यावर चर्चा होईल.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे, “ही भेट भारत आणि श्रीलंका यांच्यातील सखोल, बहुआयामी आणि ऐतिहासिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही भारताच्या ‘पडोसी पहले’ धोरण आणि ‘सागरी दृष्टीकोन’ अंतर्गत दोन्ही देशांमधील मैत्रीला अधिक बळ देईल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode