बाडमेर, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : राजस्थानच्या बाडमेर येथी आज, गुरुवारी सकाळी स्कॉर्पिओ आणि ट्रेलर यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडली. बालोतरा परिसरात झालेल्या या अपघातानंतर स्कॉर्पिओ गाडीने पेट घेतला. यात चौघांचा होरपळून मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी जोधपूरला हलवण्यात आलेय.
यासंदर्भातील माहितीनुसार, गुडामालानी तालुक्यातील डाभड गावातील 5 मित्र स्कॉर्पिओ गाडीतून सिणधरी येथे आले होते. रात्री त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले आणि नंतर परत गुडामालानीकडे जात असताना बालोतरा-सिणधरी मेगा हायवेवर त्यांची गाडी ट्रेलरला धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की गाडीने काही क्षणातच पेट घेतला. आग इतकी भीषण होती की स्कॉर्पिओचे दरवाजे अडकले आणि चौघे जण गाडीमध्ये अडकून राहिले. या आगीत स्कॉर्पिओमधील चार जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र ट्रेलर चालकाने धाडस दाखवत स्कॉर्पिओचा चालक असलेल्या युवकाला बाहेर ओढून काढले आणि त्याचा जीव वाचवण्यात यश मिळाले. जखमी युवकाला तात्काळ सिणधरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर त्याला जोधपूरला हलवण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सुशील कुमार यादव, पोलीस अधीक्षक रमेश, अतिरिक्त जिल्हाधिकारी भुवनेश्वर सिंग चौहान, डिप्टी निरज शर्मा, उपविभागीय अधिकारी समंदर सिंग भाटी, जिल्हा आरोग्य अधिकारी वाकाराम चौधरी आणि इतर प्रशासनिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघात इतका भयावह होता की मृतांवर ओळख पटवणे कठीण झाले असून डीएनए तपासणीनंतरच त्यांची ओळख निश्चित केली जाऊ शकते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी