अवघ्या 2 एकरांपासून 300 एकरांपर्यंतचा यशस्वी प्रवास
बंगळुरू, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यामधील मुधोळ शहरात राहणारे राजशेखर अंगडी यांनी द्राक्ष उत्पादनात आपली निष्ठा, मेहनत आणि समर्पण दाखवत केवळ 2 एकर शेतजमिनीतून सुरुवात करून 300 एकरांपर्यंतचा यशस्वी प्रवास केला आहे. ते आज एक आधुनिक, प्रगतिशील आणि अनुकरणीय शेतकरी म्हणून ओळखले जातात.
साधी सुरूवात अविश्वसनीय उंची:
राजशेखर अंगडी यांचा शेतीत प्रवेश हा एक अपघाती निर्णय होता. त्यांच्या मोठ्या भावाने - स्वर्गीय मल्लिकार्जुन अंगडी यांनी शेती अर्धवट सोडून बँकेच्या नोकरीसाठी प्रयाण केले आणि शेतीचा भार राजशेखर अंगडी यांच्या खांद्यावर आला. तेव्हा ते अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला होते. त्यांचे वडील सरकारी अधिकारी असूनही शेतीविषयी प्रचंड उत्साही होते. राजशेखरही तितकेच उत्साही असल्याने त्यांनी मोठ्या भावाने लावलेल्या द्राक्षांच्या 2 एकर जमिनीतून सुरुवात केली.
उत्कृष्ट उत्पादन आणि उत्पन्न
सुरुवात सोपी नव्हती द्राक्ष हे पीक त्या भागात नवीन होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पद्धतीचा आदर्श घेत तो प्रयोग करत होते. मराठी न येत असूनही त्यांनी महाराष्ट्रात वारंवार भेटी दिल्या आणि वैज्ञानिक, तज्ज्ञांशी सातत्यानं सल्लामसलत केली. अखेर त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले आणि एक अत्यंत यशस्वी वाटचाल सुरू झाली. भरघोस उत्पादन आणि चांगले दर मिळाल्यामुळे त्यांनी शेतकीत नवे उच्चांक गाठले.
उत्पन्नाचे भांडवलात रूपांतर: इतर शेतकऱ्यांप्रमाणे केवळ उत्पन्नाचा उपभोग घेण्याऐवजी, त्यांनी मिळालेल्या पैशातून शेतजमिनी वाढवायला सुरुवात केली – दोन एकरांपासून 10,15 आणि थेट 300 एकरांपर्यंत. हे सर्व त्यांच्या नाविन्यपूर्ण शेतीपद्धती, ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापरामुळे शक्य झाले, असे मत 'रण्ना बेलगळी' (महालिंगपूरजवळ) येथील कृषी पदवीधर आणि सल्लागार उद्योजक शिवयोगी आर. ब्याकोड यांनी व्यक्त केले.
शिस्तबद्ध नियोजन, व्यवहार्य दृष्टिकोन आणि मेहनती स्वभाव: राजशेखर अंगडी हे अशा शेतकऱ्यांपैकी नाहीत जे अपयशासाठी सतत कारणे देतात. ते पूर्णपणे व्यावहारिक, यथार्थदर्शी आणि प्रचंड मेहनती आहेत. गेल्या 35 वर्षांत त्यांनी बागायतीपासून सुरुवात करून ऊस, हळद, मका, सोयाबीन आणि बीटी कपाशी यांची लागवड केली.
उच्च उत्पादन, उत्पन्न आणि जमीन वाढ
त्यांनी 1990 मध्ये द्राक्ष लागवड सुरू केली आणि दोन दशके ती चालू ठेवली. त्यात प्रचंड यश मिळाल्याने त्यांनी 50 एकरांपर्यंत द्राक्षाची लागवड वाढवली. मात्र, दर घसरू लागल्याने त्यांनी दुसऱ्या पीकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. मात्र, द्राक्षांनी दिलेल्या उत्पन्नातून त्यांनी एकूण 300 एकर जमीन खरेदी केली! त्यामुळे, आश्चर्य वाटेल पण त्यांनी नंतर द्राक्ष लागवड पूर्णपणे बंद केली.समस्या नेहमीच असतात: शेतकरी कामगारांअभावी व इतर समस्या सांगतात, पण राजशेखर अंगडी यांचे म्हणणे आहे की कोणतेही क्षेत्र समस्यांपासून दूर नाही. समस्या असणारच, पण त्यातून मार्ग काढणे हेच खरे यश असते, असे ते ठामपणे सांगतात.
ऊस, बीटी कपाशी, हळद, मका आणि सोयाबीनची यशस्वी शेती: सध्या राजशेखर अंगडी 150 एकरांमध्ये ऊस, 40 एकरांमध्ये बीटी कपाशी बियाणे, 25 एकरांमध्ये हळद, 40 एकरांमध्ये मका आणि 12 एकरांमध्ये सोयाबीनची शेती करत आहेत. त्यांनी शेतीमध्ये एक आदर्श नमुना तयार केला आहे – योजना, कार्यक्षमतेने पीक उत्पादन आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वतता यांचे उत्तम मिश्रण. त्यामुळे ते खरोखरच एक प्रेरणादायक आणि अनुकरणीय शेतकरी ठरले आहेत.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी