रायपूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : छत्तीसगडच्या उत्तर बस्तरमधील अबुझमाडमध्ये आज, शुक्रवारी 208 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यात 110 महिला आणि 98 पुरुषांचा समावेश आहे. त्यांनी 153 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी एकाच वेळी आत्मसमर्पण करणे हे नक्षलविरोधी मोहिमेसाठी एक मोठे यश आहे.
यासंदर्भात एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, अबुझमाडचा बहुतांश भाग नक्षलवाद्यांच्या प्रभावापासून मुक्त झाला आहे, ज्यामुळे उत्तर बस्तरमधील दशकांपासून सुरू असलेली दहशत संपली आहे. याचा अर्थ असा की नक्षलवाद आता फक्त दक्षिण बस्तरमध्ये अस्तित्वात आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, आत्मसमर्पण केलेल्या गटात 110 महिला आणि 98 पुरुष आहेत. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी सीपीआय (माओवादी) च्या विविध स्तरांचे प्रतिनिधित्व करतात. यामध्ये एक केंद्रीय समिती सदस्य (सीसीएम), 4 दंडकारण्य विशेष प्रादेशिक समिती (डीकेएसझेडसी) सदस्य, एक प्रादेशिक समिती सदस्य, 21 विभागीय समिती सदस्य (डीव्हीसीएम), 61 क्षेत्र समिती सदस्य (एसीएम), 98 पक्ष सदस्य आणि 22 पीएलजीए/आरपीसी/इतर कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
नक्षलविरोधी कारवाईदरम्यान, माओवाद्यांनी 153 शस्त्रे पोलिसांना सोपवली. यामध्ये 19 एके-47 रायफल्स, 17 एसएलआर रायफल्स, 23 आयएनएसएएस रायफल्स, एक आयएनएसएएस एलएमजी, 35 थ्री-नॉट-थ्री रायफल्स, 4 कार्बाइन, 11 बीजीएल लाँचर्स, 41 बारा-बोर किंवा सिंगल-शॉट गन आणि एक पिस्तूल यांचा समावेश आहे. या मोठ्या आत्मसमर्पणामुळे भारतातील डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांचा एकेकाळी बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बस्तर विभागात माओवादी नेटवर्क आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या शीर्ष माओवादी नेत्यांमध्ये रूपेश उर्फ सतीश (केंद्रीय समिती सदस्य), भास्कर उर्फ राजमान मांडवी (डीकेएसझेडसी सदस्य), रनिता (डीकेएसझेडसी सदस्य), राजू सलाम (डीकेएसझेडसी सदस्य), धन्नू वेट्टी उर्फ संतु (डीकेएसझेडसी सदस्य) आणि रतन एलाम (प्रादेशिक समिती सदस्य) यांचा समावेश आहे.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी