लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर अहमदपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अंदाजे ₹ 5,03,000 किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले यांनी गुप्त माहीतीच्या आधारे तात्काळ एक विशेष पथक तयार केले होते. या पथकात पोलीस कर्मचारी धर्मपाल गुट्टे, प्रशांत इबितकर, सदाशिव बिरादार, विशाल मुंडे आदींचा समावेश होता.
भाग्यनगर अहमदपूर येथील काझी नगर पाटीजवळ या पथकाने सापळा रचला. यावेळी, देवानंद गंगाधरराव कल्याणे वय50 वर्ष, रा. खंडाळी, ता. अहमदपूर, जि. लातूर आणि बळीराम दत्ता जाधव वय42 वर्ष, रा. वहाद, ता. कंधार, जि. नांदेड हे प्रतिबंधित गुटख्याचा साठा घेऊन जात असताना आढळून आले.
पोलिसांनी केलेल्या झडतीमध्ये, प्रतिबंधित अन्नपदार्थांचा गुटखा, रोख रक्कम, वाहतुकीसाठी वापरलेले वाहन आणि मोबाईल असा एकूण अंदाजे ₹ 5,03,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फिर्यादी पोलीस नाईक धर्मपाल गोविंदराव गुट्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील आरोपीं विरुद्ध पोलीस स्टेशन अहमदपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद म्हेत्रेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis