नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसेच कामगार आणि रोजगार मंत्रालय यांच्या ‘फिट इंडिया’ या प्रमुख उपक्रमांतर्गत, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2025 पासून आयर्न व्हील्स ऑफ युनिटी या नावाने दोन देशव्यापी सायकलिंग मोहिमा आयोजित करणार आहे. या मोहिमांचा मार्ग देशाच्या कानाकोपऱ्यातून जात असून ही मोहीम राष्ट्रीय एकता आणि तंदुरुस्त तसेच मजबूत भारताच्या भावनेचे प्रतीक आहेत.
काश्मीर ते कन्याकुमारी (K2K) सायकलिंग मोहीम 31 ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथून सुरू होणार असून 4480 किलोमीटरचे प्रचंड अंतर पूर्ण करत पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधून प्रवास करेल आणि 16 नोव्हेंबर 2025 रोजी तमिळनाडूतील कन्याकुमारी, तामिळनाडू येथे पूर्ण होईल. या उपक्रमात एकूण 150 सायकलस्वार सहभागी होतील - जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीला साजेसे अभिवादन ठरेल.
ही मोहीम गिर्यारोहक निशा कुमारी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. निशा कुमारी यांनी 17 मे 2023 रोजी एव्हरेस्ट सर केले होते आणि त्यानंतर 'हवामान बदल होण्यापूर्वी स्वतःला बदला' हा संदेश देण्यासाठी भारतातून लंडनपर्यंत सायकल प्रवास केला होता.
अशीच आणखी एक मोहीम, ‘पेडल टू प्लांट’ अरुणाचल प्रदेशातील पांगसौ पासून सुरू होणार आहे. ही मोहीम 4,000 किलोमीटर अंतर पूर्ण करेल. या मोहिमेचा मार्ग आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून जात असून 31 डिसेंबर 2025 रोजी गुजरातमधील मुंद्रा येथे मोहिमेची सांगता होईल. या मोहिमेच्या मार्गावर, मोहिमेत सहभागी झालेले सायकलस्वार सुमारे एक लाख रोपे लावतील तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हवामान बदल आणि शारीरिक तंदुरुस्तीविषयी जागरूकता सत्रे आयोजित करतील.
केंद्रीय युवा व्यवहार, क्रीडा आणि कामगार तसेच रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले: “फिट इंडिया आयर्न व्हील्स ऑफ युनिटी मोहिमेत सहभागी होणाऱ्या सायकलस्वारांना मी शुभेच्छा देतो. ही मोहीम आपले महान स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली म्हणून आयोजित केले जात आहे. भारतीय नागरिकांना अधिक तंदुरुस्त आणि निरोगी बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला बळकटी देईल आणि सक्रिय जीवनशैली स्वीकारण्याबद्दल जागरूकता निर्माण करेल. सायकलिंग हा तंदुरुस्ती राखण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि प्रदूषणावर सर्वोत्कृष्ट उपाय आहे, असे मी यापूर्वीही सांगितले आहे. प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी दररोज किमान 30 मिनिटे ते एक तास सायकलिंगसाठी द्यावेत असे मी आवाहन करतो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule