लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी एका शेतकरी कुटुंबाचे घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी किनगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
हनमंत किशनराव शेलाळे (वय ५३, रा. धसवाडी, ता. अहमदपूर) यांच्या फिर्यादीनुसार, धसवाडी येथील त्यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. चोरट्याने घराचे कडी-कोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील जुने वापरते सोन्याचे दागिने (वजन १ तोळा, किंमत रु. ५७,०००/-) व नगदी रोख रु. ६५,०००/- असा एकूण १,२२,०००/- रुपयांचा माल चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच हनमंत शेलाळे यांनी किनगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन किनगाव येथे गुरनं. २३१/२०२५ कलम ३३१ (४), ३०५ (A) B.४.५. नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोह डी. ही. मुरुळे यांनी गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काटापले यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्यासोबत पोकॉ किशोर सोमवाणे आणि पोकॉ सुनील श्रीरामे हे तपास करत आहेत. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis