भारताकडे सृष्टीच्या पोषणाचा शाश्वत जीवनमार्ग - सरसंघचालक
पुणे, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। भौतिक प्रगतीच्या नावाखाली मानवाने निसर्गाची अपरिमीत हानी केली आहे. शाश्वत विकासासाठी मनुष्याबरोबरच निसर्गाच्या उन्नतीचा मार्ग गरजेचा आहे. सृष्टीच्या पोषणाचा हा विचार योगशास्त्रात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक सं
डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक


पुणे, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। भौतिक प्रगतीच्या नावाखाली मानवाने निसर्गाची अपरिमीत हानी केली आहे. शाश्वत विकासासाठी मनुष्याबरोबरच निसर्गाच्या उन्नतीचा मार्ग गरजेचा आहे. सृष्टीच्या पोषणाचा हा विचार योगशास्त्रात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. निसर्गासोबत शाश्वत जगण्याचा मार्ग हा भारताकडेच असून, विश्वकल्याणासाठी तो आपल्याला प्रशस्त करायचा आहे, असेही ते म्हणाले.

लोणावळा येथील स्वामी कुवलयानंद स्थापित कैवल्यधाम योग संशोधन संस्थेच्या १०१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सन्यास आश्रमाचे प्रमुख महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी, माजी केंद्रीय मंत्री आणि शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी आदी उपस्थित होते. डॉ. मोहन भागवत म्हणाले, योग हा केवळ व्यायाम प्रकार नसून सर्वांना जोडण्याचा मार्ग आहे. शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याचे संतुलन योगाभ्यासातून साध्य होते. योगशास्त्राच्या माध्यमातून व्यक्ती निर्माण करत पृथ्वीवर शांती आणि सुखाचे नवे युग निर्माण करण्याचे कार्य कैवल्यधाम करत आहे.

स्वामी विश्वेश्वरानंद म्हणाले, स्वामी कुवलयानंद यांनी योग विद्येला आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करत संरक्षित करण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्याच दूरदृष्टीतून कैवल्यधाम सारखी संस्था निर्माण झाली, जिने आपले प्राचीन ज्ञान आणि परंपरेला बीज स्वरूपात सुरक्षित ठेवले आहे. शताब्दी पूर्ण करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कैवल्यधाम या दोन्ही संस्था राष्ट्रसेवेचे कार्य करत आहेत.

योगशास्त्रातील शुद्धतेचे प्रतीक म्हणजे कैवल्यधाम असल्याची भावना सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, व्यक्तीला समाजातील योग्य घटक बनविण्यासाठी कैवल्यधाम कार्यरत आहे. तर क्षमतावान समर्थ भारताच्या विकासासाठी संघटित समाज निर्माण करण्याचे कार्य संघ करत आहे. संघाने शताब्दी वर्षात निश्चित केलेल्या पंच परिवर्तनाच्या विषयांत समाज सहभागी झाला असून, त्यातून मोठे समाज परिवर्तन होणार आहे.

योगशास्त्रातील विज्ञान आणि परंपरा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी कैवल्यधाम प्रयत्नशील असल्याचे सुबोध तिवारी यांनी सांगितले. ते म्हणाले, उच्चशिक्षणात योग अभ्यासाच्या समावेशाबरोबरच कर्करोगाच्या उपचारासाठी योगशास्त्राच्या उपयोगावरही संशोधन कैवल्यधाममध्ये होत आहे. कार्यक्रमात डॉ. शरदचंद्र भालेकर लिखित 'योग पोलिस' आणि डॉ. ऋतू प्रसाद लिखित 'सात्विक आहार' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन शनाया वात्स्यायन यांनी केले. सरसंघचालकांनी सकाळच्या सत्रात कैवल्यधाममधील प्रयोगशाळा आणि संस्थांना भेट दिली.

विज्ञान आणि अध्यात्म परस्परविरोधी नाही - सरसंघचालक

विज्ञान आणि अध्यात्मात विरोध असण्याचे कारण नाही. कारण विज्ञान जसे प्रयोगातून सिद्ध होते, तसे अध्यात्म हे अनुभवातून सिद्ध होते. अंतःस्फूर्ती किंवा अंतर्विज्ञानाद्वारेच पुढील वैज्ञानिक संशोधन शक्य आहे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडले. ते म्हणाले, विज्ञानाची प्रगती सूक्ष्मातील सूक्ष्म कणांच्या ज्ञानापर्यंत पोहोचली आहे. मात्र त्याच्यापुढेही सूक्ष्म कण आहे. तर दुसरीकडे अवकाशात दिसणारे महाकाय विश्व एक प्रकारचा भूतकाळच आहे. त्यामुळे आधुनिक विज्ञानही नव्या निष्कर्षांपर्यंत पोहोचत आहे.

पू. सरसंघचालक म्हणाले की,

- व्यक्ती, परिवार, समाज आणि विश्वाचे भले योग करू शकतो.

- विविधता परिवर्तनशील आहे. एकता शाश्वत आहे.

- भारताचा उत्कर्ष हा विश्वाच्या भल्यासाठी आहे.

- विश्वाच्या कल्याणासाठी भारताचे प्राचीन ज्ञान गरजेचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande