नागपूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। येथील वायुसेना नगर येथे 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी देखभाल कमांड कमांडर्सची परिषद आयोजित करण्यात आली होती. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी.सिंग या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. एअर मार्शल व्हीके गर्ग, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनन्स कमांड यांनी त्यांचे स्वागत केले. हवाई दल प्रमुखांचे आगमन झाल्यावर त्यांना मानवंदना देण्यात आली.
‘स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासाद्वारे क्षमता विकास’, या संकल्पनेवरील या परिषदेत स्वावलंबन, स्वदेशीकरण आणि महत्त्वाच्या मालमत्तेचे दीर्घकालीन संवर्धन यावर भर देण्यात आला. या परिषदेने कमांडर्सना प्रमुख ऑपरेशनल, देखभाल आणि लॉजिस्टिक्स आव्हानांवर चर्चा करण्यासाठी, तसेच मिशनची तयारी आणि ताफ्याची उपलब्धता वाढवण्यासाठी नवोन्मेषी उपायांची देवाण-घेवाण करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून भूमिका बजावली.
परदेशी ओईएम कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करणे, प्रणालीची विश्वासार्हता वाढवणे, प्रणालीचे आयुर्मान वाढवण्याचा अभ्यास, पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवणे आणि तांत्रिक नवोन्मेष या उद्देशाने मेंटेनन्स कमांडने हाती घेतलेल्या उपक्रमांची हवाई दल प्रमुखांना माहिती देण्यात आली. हवाई दल प्रमुखांनी, भारतीय हवाई दलाच्या कार्यान्वयन तत्परतेसाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या राष्ट्रीय दृष्टीकोनाला अनुसरून देखभाल कमांडच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली.
हवाई दल प्रमुखांनी भारतीय हवाई दलाच्या कामकाजात देखभाल कमांडची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व्यावसायिकता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या उच्च दर्जासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले, ज्यामुळे देशाच्या आकाशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय हवाई दलाची वचनबद्धता अधिक दृढ होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule