नीलेश घायवळ टोळीतील मुसाब शेखला अटक; शेखच्या ताब्यातून ८७८ ग्रॅम गांजा जप्त
पुणे, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील सराईत गुन्हेगार आणि ‘मकोका’च्या गुन्ह्यातील आरोपी मुसाब शेख याला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून ८७८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच, त्याचा साथीदार तेजस डांगी यालाही ताब्यात घेतले
नीलेश घायवळ टोळीतील मुसाब शेखला अटक; शेखच्या ताब्यातून ८७८ ग्रॅम गांजा जप्त


पुणे, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील सराईत गुन्हेगार आणि ‘मकोका’च्या गुन्ह्यातील आरोपी मुसाब शेख याला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून ८७८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच, त्याचा साथीदार तेजस डांगी यालाही ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुसाब इलाही शेख (वय ३५, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) आणि तेजस पूनमचंद डांगी (वय ३३, रा. मानाजीनगर, नऱ्हे) अशी आरोपींची नावे आहेत. ही माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख आणि पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

घायवळ टोळीतील मुसाब शेख हा सिंहगड रस्ता परिसरातील एका मसाला शॉपसमोर आल्याची माहिती पोलिस अंमलदार अमोल घावटे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध याआधी दरोडा, मारहाण, खंडणी, शस्त्रास्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. चौकशीदरम्यान, त्याने साथीदार तेजस डांगीकडून गांजा आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी डांगीलाही ताब्यात घेतले. डांगीवर यापूर्वी हिंजवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande