जळगाव , 17 ऑक्टोबर (हिं.स.) एरंडोल पोलिसाला तीन हजाराची लाच स्वीकारताना धुळे एलसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. बापू लोटन पाटील असं लाचखोर पोलिसाचं नाव असून या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. बापू पाटील हे एरंडोल पोलीस ठाण्यात हवालदार आहेत. आणि ते नुकतेच जळगावहून एरंडोलला बदलून आले होते. एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात जप्त केलेली दुचाकी परत करण्यासाठी हवालदार पाटील यांनी म्हसवे (ता. पारोळा) येथील तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती.वास्तविक तक्रारदार स्वतः अपघातात गंभीर जखमी झाले होते. तडजोडीअंती तीन हजार रूपये देण्याचे ठरल्यानंतर हवालदार बापू पाटील यांनी तक्रारदाराला महामार्गावरील एरंडोल चौफुलीवर पैसे देण्यासाठी भ्रमणध्वनीवरून येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पाटील यांनी तक्रारदाराकडून तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताच धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर