सुकमा, 18 ऑक्टोबर (हिं.स.) : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 लाख रुपयांचा इनामी नक्षलवादी मुचाकी मंगा याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलात लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणातील स्फोटके जप्त केली आहेत. तो अनेक नक्षली घटनांमध्ये सामील होता आणि पोलिस त्याच्या शोधात होते. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
सुकमा जिल्ह्यात कोंटा पोलिस व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत ही मोठी कामगिरी करण्यात आली. अटक केलेला आरोपी मुचाकी मंगा, वय 24, वडीलांचे नाव मुचाकी बुधरा, हा किन्द्रेलपाड, पोलीस ठाणे भेज्जी येथील रहिवासी आहे.तो गेल्या 5 वर्षांपासून कोंटा एरिया कमिटी अंतर्गत लोकल ऑर्गनायझेशन क्वॉड (एलओएस) सदस्य म्हणून सक्रिय होता.सूत्रांनुसार, पोलिसांना माहिती मिळाली होती की नक्षली उसकावाया आणि नुलकातोंग यामधील मार्गावर पोलिसांना लक्ष्य करत आयईडी लावण्याच्या तयारीत आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर सुकमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने कारवाई करत आरोपीला अटक केली.
चौकशीत मुचाकी मंगाने अनेक नक्षली घटनांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. यामध्ये फेब्रुवारी–मार्च 2025 मध्ये गाव बंडा व उसकावाया भागात रस्त्यावर आयईडी लावणे, तसेच 2024 मध्ये भंडारपदर येथील ग्रामस्थ ओयामी पांडूची हत्या अशा गंभीर घटना सामील आहेत.
अटक केलेल्या नक्षलवाद्याच्या मार्गदर्शनावरून पोलिसांनी जंगलातून जिलेटिन रॉड, डेटोनेटर, गन पावडर, कोर्डेक्स वायर, धारदार चाकू, नक्षली बॅनर-पोस्टर्स आणि आयईडी उपकरणे जप्त केली आहेत.
पोलिसांनी सांगितले की आरोपीविरुद्ध कोंटा आणि भेज्जी पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहेे.----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी