- दादासाहेब फाळके चित्रनगरीचा उपक्रम
मुंबई, 18 ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ या उपक्रमांतर्गत आयोजित 'अवघाचि संसार' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी, ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. चित्रपटाच्या चित्रीकरणा संदर्भातील आठवणींना बाळ धुरी यांनी उजाळा दिला. तर पुरुषोत्तम बेर्डे यांनी या निमित्ताने मराठी चित्रपटांचा आजवरचा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या काळातील दर्जेदार चित्रपटांचे वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचावे आणि नव्या पिढीने तयार केलेले सकस चित्रपट प्रेक्षकांना पाहता यावेत, या उद्देशाने दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
या मंडळाचे सभासद होण्यासाठी ५०० रुपये शुल्क तीन वर्षांकरिता असून मंडळाच्या वतीने दर महिन्याला एक चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
अधिकाधिक प्रेक्षकांनी या मंडळाचे सभासद होत, दर्जेदार अभिजात मराठी चित्रपटांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी केले आहे.
यावेळी महामंडळाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, समन्वय अधिकारी सुचित्रा देशपांडे यासह महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी