नवी दिल्ली , 19 ऑक्टोबर (हिं.स.)।अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आई बाबा झाले आहेत. चड्ढा कुटुंबीयांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. परिणीतीने आज (१९ ऑक्टोबर) गोंडस बाळाला जन्म दिला आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत परिणीती आणि राघव यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. काही वेळापूर्वीच परिणीतीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
राघव चड्ढा यांनी परिणीतीसोबत एक सुंदर पोस्टर शेअर केले आहे, ज्यावर लिहिले आहे ,“तो अखेर येथे आलाय, आमचा लाडका बेबी बॉय! आणि आम्हाला आता त्याच्याआधीचं आयुष्य आठवतही नाही! आमचे हात भरले आहेत, आणि हृदय आनंदाने भरून आलंय. याआधी आम्ही एकमेकांसाठी होतो. आता आमच्याकडे सगळं काही आहे.” या कॅप्शनमध्ये राघवने नजरेपासून वाचवण्यासाठी ‘नजर न लागो’ इमोजी सुद्धा वापरला आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २०२३मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नानंतर दोन वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात परिणीतीने गरोदर असल्याचं सांगितलं होतं. आता चिमुकल्याच्या आगमनाने दोघांच्याही कुटुंबात आनंद साजरा होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode