सोलापूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। घोंगडे वस्तीतील धानप्पा श्रीशैल नरोणे या चाळीस वर्षीय तरुणाला कर्नाटकातील बंगळूर पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांना फोन करून शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई झाली.
जोडभावी पेठ पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. धानप्पा हा चॉकलेट आणि बिस्किटे विक्री करणाऱ्या एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो, अशी माहिती त्याचा भाऊ नागेश यांनी दिली.मंत्री प्रियांक यांना धानप्पा याने तीन दिवसांपूर्वी फोन करून शिवीगाळ केली होती. कर्नाटकांतील माध्यमांत तो संवाद व्हायरल झाला. त्या संवादात धानप्पा हा प्रियांक यांना अश्लील शिव्या देताना आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांक खर्गे यांनी आरएसएसविरोधात वक्तव्य केले होते. त्यावरून संतप्त होऊन धानप्पा याने ही कृती केल्याचे व्हायरल संवादातून दिसत आहे. धानप्पा याने आपण आरएसएसशी जोडलेलो असल्याचेही त्या संवादात म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड