नांदेड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या लातूरच्या एका कुटुंबावर नांदेड जिल्ह्यात काळाने घाला घातला.
तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात सॉफ्टवेअर इंजिनीअर भावासह बहिणीचा जागीच मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरालगत असलेल्या भानेगाव फाट्याजवळ जेसीबी, आयशर आणि अन्य एका चारचाकी वाहनाचा अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहनाचा चुराडा झाला. मनोज रामराव देगुरे (34) आणि मंजुषा देविदास अहिनवार (27) असं मयत बहीण भावाचं नाव आहे.
लातूर जिल्ह्यातील रामराव देगुरे हे शिक्षक आहेत. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला मुलगा मनोज देगुरे याच्या विवाहासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील स्थळ आलं होते. देगुरे कुटुंबीय आणि त्यांच्या मुली, जावई आणि इतर नातेवाईक चारचाकी वाहणानं जात होते. हदगाव शहरापासून आठ किलोमीटर दूर असलेल्या तुळजापूर-नागपूर या राष्ट्रीय महार्गावरील भानेगाव येथे रस्त्याच्या डागडुजीचं काम सुरु आहे. रस्त्यावर जेसीबी थांबलेलं होतं. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने जेसीबीला जोरदार धडक दिली. त्यापाठोपाठ चारचाकी वाहन आयशरला धडकलं. हा तिहेरी अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहनाचा आणि आयशर ट्रकचा चुराडा झाला. शिवाय चालकाच्या बाजूला बसलेल्या मनोज देगुरे आणि मंजुशा अहिनवार या बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis