चंद्रपूर, 2 ऑक्टोबर, (हिं.स.)।
शासन निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा 2025’ या अभियानाचा समारोप चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 2 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांनी करण्यात आला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबर रोजी सुरुवात होऊन, महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी 2 ऑक्टोबर रोजी पूर्ण झालेल्या या अभियानात नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम घेण्यात आले. “स्वच्छोत्सव” या थीमनुसार सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा झेंडींचे रूपांतरण, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, स्वच्छ-हरित उत्सव तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. त्यानंतर जटपुरा गेट भागात मनपा शाळेतील विद्यार्थी तसेच चंद्रपूर बचाओ संघर्ष समितीच्या सदस्यांनी स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर केले. यावेळी जटपुरा गेट ते गांधी चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर मनपा कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
सदर कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रवार, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, सहायक आयुक्त अनिलकुमार घुले, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी, नगरसचिव नरेंद्र बोबाटे, समाज विकास अधिकारी सचिन माकोडे, डॉ. अमोल शेळके, मनीषा नैताम तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव