चंद्रपूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।
चंद्रपूर शहरालगत वाहणाऱ्या इरई नदीच्या चुकीच्या पूररेषेमुळे नदी काठावरील व आसपासच्या परिसरातील अनेक घरे पुरामुळे बाधित होऊन नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब उघडकीस आली आहे, या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी इरई नदी पूररेषेचे नव्याने सर्वेक्षण करून पुररेषा निश्चित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नव्याने सर्वेक्षण करून पूररेषा निश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे.
चंद्रपूर शहरालगत वाहणारी इरई नदी ही दरवर्षी पूरामुळे नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून, नदीकाठावरील घरे व भूखंडांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागते. 2013 च्या महापुरात अनेक घरे बाधित झाली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाने 2014 मध्ये सर्वेक्षण करून आयआयटी मुंबईमार्फत 2016 मध्ये अहवाल सादर केला होता. या अहवालास 2017 मध्ये मान्यता देण्यात आली.
मात्र, संबंधित सर्वेक्षणातील काटछेद 500 मीटर अंतरावर घेतल्यामुळे अनेक घरे व अकृषिक भूखंड चुकीच्या पद्धतीने ब्ल्यूझोनमध्ये आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत असून मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. डायरेक्टर जनरल मेरी, नाशिक यांच्या 16 नोव्हेंबर 2015 च्या परिपत्रकानुसार घनदाट लोकवस्तीच्या भागात काटछेदाचे अंतर 100 मीटर असणे बंधनकारक आहे. त्याकडे जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केल्याने ही पूररेषा निश्चिती चुकीची ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली. मुल विश्रामगृह येथे झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नव्याने सर्वेक्षण करून पूररेषा निश्चित करण्याचे निर्देश दिले. नदीकाठावरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व आर्थिक नुकसानीपासून बचावासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव