रत्नागिरी, 2 ऑक्टोबर, (हिं. स.) : कधी काळी कचरा व्यवस्थापनाच्या अडचणीत सापडलेले चिपळूण शहर आज आरोग्यदृष्ट्या आदर्श बनले आहे. याचे सर्व श्रेय पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाते, असे गौरवोद्गार माजी आमदार, माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम यांनी व्यक्त केले.
चिपळूण पालिका आणि पूज्य गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गांधारेश्वर येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी रमेशभाई कदम बोलत होते. ते पुढे म्हणाले, “कचरा प्रकल्प उभारण्यात आल्याने शहरात घनकचऱ्याचे व्यवस्थापन सुरळीत झाले असून, पालिका नियमितपणे घरोघरी जाऊन कचरा संकलन करत आहे. हे कार्य कौतुकास्पद आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीमुळेच आज चिपळूणकर नागरिक निरोगी जीवन जगत आहेत.”
ते पुढे म्हणाले नगरपालिका स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. प्लास्टिक मुक्तीच्या लढ्यातदेखील पालिका आघाडीवर आहे. मात्र काही नागरिक अजूनही रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असून, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयद्रथ खताते, चिपळूण अर्बन बँकेचे माजी संचालक सतीशअप्पा खेडेकर, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक होमकळस, सामाजिक कार्यकर्ते सुरेश राऊत, आरोग्य विभागाचे सुजित जाधव, पाणीपुरवठा विभागाचे रोहित खाडे, निवेदक शिक्षक प्रकाश गांधी, सुनील खेडेकर, विवेक रेळेकर, जाफर गोठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी परीक्षक हसन मुसा, गिरीराज पांडे, विनायक बांद्रे व शरयू इंदुलकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सई वरवटकर व सुनील खेडेकर यांनी केले. कार्यक्रमात विविध गटांतील निबंध व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. सहभागी शाळांना पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी