पालघर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। पालघर तालुक्यातील सह्याद्री मित्र परिवार या दुर्गसंवर्धनासाठी कार्यरत संस्थेतर्फे २ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक भवानगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात माकुणसार, केळवे, मथाणे, खारेकुरण, बोईसर आणि विरार परिसरातून तब्बल २५ तरुण-तरुणींनी उत्साहाने सहभाग घेतला. गडावरील वाढलेले गवत व केरकचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर गडावर झेंडूची तोरणे, रांगोळी व फुलांनी सजावट करून शस्त्रपूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर चिमाजी आप्पा तसेच ज्ञात-अज्ञात वीरांना अभिवादन करून “दसरादुर्गोत्सव” मोठ्या जल्लोषात साजरा झाला. पूर्वी पावसाळा संपल्यानंतर गडावर स्वच्छता करून आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा होती. ही परंपरा हरवू लागली असताना गेल्या १२ वर्षांपासून सह्याद्री मित्र परिवार हा उपक्रम सातत्याने राबवून परंपरा पुन्हा जिवंत ठेवत आहे. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी गडकिल्ल्यांचा इतिहास आणि दुर्गसंवर्धनाची गरज यावर प्रकाश टाकला. “अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीमध्ये संस्कार, जबाबदारीची जाणीव आणि गडकोटांविषयी अभिमान निर्माण होतो,” असे मत मार्गदर्शक उमेश पाटील आणि राजेश वैद्य यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निकेश पाटील, गौरव राऊत, अरविंद पाटील, रुपेश पाटील, दिनेश मोरे, चिंतन सावे, प्रतिश किणी, संतोष पाटील, सर्वेश पाटील, गौरव पाटील, विजेंद्र म्हात्रे, दीप्ती पाटील, मिरीता पाटील, रागिणी पाटील व अदिती पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी मनापासून परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL