रत्नागिरी, 2 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील दैवज्ञ हितवर्धक नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांनात ९ टक्के लाभांश जाहीर केला आहे.
पतसंस्थेची 2024-25 या आर्थिक वर्षाची सर्वसाधारण सभा दैवज्ञ भवनातील पांडुरंग गणपत लांजेकर सभागृहात अध्यक्ष विजय पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सेक्रेटरी रत्ना आचरेकर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. उपस्थित सभासदांच्या प्रश्नांना समर्पक आणि यथायोग्य उत्तरे अध्यक्षांनी दिली. संस्थेने आगामी वर्षाकरिता मांडलेल्या सुमारे एक कोटीच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. त्या आर्थिक वर्षामध्ये स्वभांडवल जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यासाठी अध्यक्षांनी आवाहन केले. त्याला उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला. गेल्या 23 वर्षांमध्ये संस्थेने पूर्णपणे स्वभांडवलावर व्यवसाय करून सर्वच्या सर्व वर्ष नफ्यामध्ये संस्था चालवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी आपल्या सभासदांसाठी संस्था लाभांश जाहीर करत असते यावर्षी संस्थेने नऊ टक्के लाभांश जाहीर केला आहे.
यावर्षीपासून संस्थेने समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही सुरू केला आहे. त्यामध्ये आर्या खेडेकरला दहावीमध्ये 99 टक्के गुण मिळाल्याबद्दल ज्येष्ठ संचालक अनिलराव उपळेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. स्वरा आणि स्वराली पाटणकर यांनी बारावीत 88 टक्के गुण मिळवले. म्हणून त्यांचे कौतुक संस्थेचे संचालक महेश खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रत्नागिरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रसाद उपळेकर, आदर्श शिक्षिका सौ.आदिती वेर्णेकर, सौ. शमिता उपळेकर, राज्यस्तरीय शिक्षण क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त सौ. पूर्वा मिरकर, दैवज्ञ समाजाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. केतकी कारेकर, भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभाग व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्षपदी प्रमोद खेडेकर, एलआयसीच्या एक हजार पॉलिसीज केल्यामुळे सहस्र वीर या सत्काराने गौरवण्यात आलेले महेशराव उपळेकर यांचा सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी