नागपूर, 02 ऑक्टोबर (हिं.स.) डा. आंबेडकरांनी नागपुरच्या भूमीत धम्मदीक्षा देवून आमचा मार्ग प्रशस्त केला. आता आपण महाबोधी महाविहार मुक्त करण्याचा संकल्प घेवून जाऊ या, असे आवाहन भदंत विनाचार्य यांनी येथे केले. ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने आायोजित सोहळ्यात ते बोलत होते. धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून धम्म लर्निंग केंद्र, सारनाथ, उत्तर प्रदेशचे भदंत चंदिमा थेरो, निवृत्त आयएएस डाॅ. राज शेखर वुंड्रु, स्मारक समितीचे अध्यक्ष नागार्जुन सुरेई ससाई, स्मारक समितीचे सचिव डाॅ. राजेंद्र गवई आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी भदंत विनाचार्य म्हणाले की, अपूर्ण राहिलेली लढाई आपल्याला पूर्ण करायची आहे. सामाजिक संस्कार, संस्कृती, वारसा आणि शिक्षणातून ओळख तयार होते, हे समाजाने विसरता कामा नये. भारताला बौद्धमय करण्याचे अपूर्ण स्वप्नही पूर्ण करायचे आहे, असे ते म्हणाले. मुस्लिमांजवळ मक्का व मदिना आहे. ख्रिश्चनांकडे जेरुसलेममधील चर्च ऑफ द होली सेपल्चरससारखी धार्मिक केंद्रे आहेत. हिंदुंजवळ त्यांची मंदिरे, शिखांजवळ त्यांचे गुरूद्वारे आहे. पण, बौद्धांजवळ त्यांचा महाबोधी महाविहार नाही. बौद्धांची ही सातवी पिढी आहे. महाबोधी महाविहार मुक्त करण्याची जबाबदारी या सातव्या पिढीची आहे. १३४ वर्षांपासून सुरू असलेली लढाई आम्हाला जिंकायची आहे, असे भदंत विनाचार्य यांनी सांगितले. हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चनांची एकजूट आहे. पण, भारतातील बौद्ध अजूनही एकजूट झालेली नाही. इतर सर्व धर्मांचे राष्ट्रीय धर्मगुरू आहे. पण, बौद्धांचा एकही धर्मगुरू नाही, भारतात राष्ट्रीय भिक्खू संघ नाही याकडे विनाचार्य यांनी लक्ष वेधले. स्मारक समितीला सहकार्य करा स्मारक समितीतील काही लोकांबद्दल आकस असल्यामुळे काही दहा बारा मुले एखाद्या खड्ड्याचे छायाचित्र काढून व्हायरल करतात आणि कुठेतरी वातावरण खराब करून जातात. परंतु आम्हाला सहकार्य करा असे आवाहन स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई यांनी प्रास्ताविकातून केले. स्मारक समिती फक्त सूचना करते. समितीला खर्च करण्याचा अधिकार नाही. भूमिगत पार्किंग बुजवल्या नंतर जाळपोळ करण्याची गरज नव्हती. त्यामुळे अधिकारी दीक्षाभूमीवर येण्यास घाबरायला लागलेले आहे. परिणामी येथील विकासकामे थांबलेली आहे. स्मारक समितीत पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध आहे. एकही ब्राम्हण नाही. तरीही काही मुठभर लोक गैरसमज पसरवतात अशी खंत गवई यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना डाॅ. राज शेखर वुंड्रु यांनी डाॅ. आंबेडकरांनी बुद्धीइझमला एक नवी सामाजिक अभिव्यक्ती दिली. धम्मक्रांती चळवळीत आंबेडकरांनी सकारात्मकता आणली. समता, स्वतंत्रता, बंधुता, मैत्री, अहिंसा ही मूल्ये दिली. सोबतच कृतीभिमुख व तर्कसंगत चळवळ दिली. समाजात समानता आणि सद्भाव आणावा लागेल असे ते म्हणाले.-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी