नाशिक, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या कार्यकाळात सभेची मान्यता न घेताच लाखो रूपयांची कामे करण्यात आली आहेत. त्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. तसेच झालेल्या बांधकामांची चौकशी करण्यात यावी, यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पत्रही देण्यात आल्याची माहिती सभापती कल्पना चुंभळे यांनी सर्वसाधारण सभेत दिली. मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करून पिंगळे यांच्या कार्यकाळातील कामे नामंजूर करण्यात आली.
चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज झाले. यावेळी पिंगळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची पोलखोल करण्यात आली. २९ एप्रिल २०२४ ला झालेल्या सर्वसाधारण सभेच्या इत्तिवृत्तातील पान क्रमांक २३५ आणि २३६ वर नवीन कागद चिकटविण्यात आला आहे. विभाजनाचा ठराव सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला नसतानाही मागील तारखेने तसा ठराव लिहण्यात आला आणि जावक करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र हा प्रस्ताव मार्च २०२५ला पणन संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. पिंगळे यांच्या काळात ज्या काही सभा झाल्या त्यास सदस्य उपस्थित नसतानाही त्यांची नावे ठरावास सूचक आणि अनुमोदक म्हणून टाकण्यात आली आहेत. पेठरोड मार्केट येथील डिपीरोड बंद करता येत नसतानाही शाळेलगतचा रस्ता भिंत टाकून बंद करण्यात आला आहे . रस्त्याचा वापर शाळेकडून केला असतानाही पिंगळे यांनी त्यावर आक्षेप नोंदविला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV