नंदुरबार, 2 ऑक्टोबर, (हिं.स.) शासकीय नोकरी मिळाली” हे वाक्य अनेक घरांमध्ये आनंदाश्रूंनी उच्चारले जाणारे ठरणार आहे. स्वप्नांना दिशा देणारा आणि संघर्षाला यशात परिवर्तित करणारा क्षण नंदुरबार जिल्हा अनुभवणार आहे. मुख्यमंत्री यांच्या
१५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत शासनाने अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण जारी केले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या स्वप्नांना मूर्त रूप मिळवून देण्याचा संकल्प
केला. दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,
नंदुरबार येथे हा सुवर्णक्षण साजरा होणार आहे. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व
औकाफ मंत्री तथा पालकमंत्री अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्रांचे
वितरण होईल. स्वप्न वास्तवात
गावागावातून अभ्यासासाठी शहरात आलेले विद्यार्थी, दिवसरात्र अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा
आयोगाच्या गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये यश मिळवणारे ५२ तरुण आणि आपल्या पालकांना
गमावूनही शासनाच्या अनुकंपा नियुक्तीद्वारे आधार मिळवणारे ९० उमेदवार हे सर्वजण आता शासन सेवेत
पाऊल ठेवणार आहेत.
• ५२ उमेदवार गट-क महसूल सहायक (लिपिक-टंकलेखक)
• ३१ उमेदवार अनुकंपा गट-क भरती
• ५९ उमेदवार अनुकंपा गट-ड भरती
असे एकूण १४२ उमेदवारांचे स्वप्न या दिवशी पूर्ण होणार आहे.
आशेचा दिवा प्रज्वलित करणारी अनुकंपा नियुक्ती
अनुकंपा नियुक्ती मिळणे म्हणजे फक्त एक नोकरी नाही; तर आधार गमावलेल्या कुटुंबासाठी जगण्याचा नवा
आधार. काही उमेदवारांच्या डोळ्यात या दिवशी आनंदाश्रू तर काहींच्या मनात कर्तव्य पार पाडण्याची नवी
उमेद आहे. “बाबा गेले, पण आता घराला आधार मिळाला” अशी भावना अनेकांच्या मनात दाटून येईल.
नव्या भविष्याची पहाट
या नियुक्त्या नंदुरबार जिल्ह्याच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. प्रशासनात तरुणाईचा नवीन ओघ येईल आणि नागरिकसेवा अधिक प्रभावी होईल. एकेकाळी अभ्यासाच्या वहीत लिहिलेली स्वप्ने आता नियुक्तीपत्रावर उमटलेली सही बनून समोर येत आहेत.
जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण
हा सोहळा केवळ नियुक्तीपत्र वितरणाचा नसून तरुणाईच्या आत्मविश्वासाचा उत्सव आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या
इतिहासात रोजगाराच्या नव्या पर्वाची सुरुवात म्हणून हा क्षण लक्षात राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर