पालघर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। राम-रहीम मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सव २०२५ च्या १३व्या वर्षात विशेष उपक्रम म्हणून दहाव्या दिवशी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाज उन्नती संघटनेचे अध्यक्ष श्री. दिपक बालकृष्ण पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात weRmore कंपनीच्या सफाळे लीडर आरती भोईर यांनी महिलांसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. महिलांनी पाळीदरम्यान कोणती काळजी घ्यावी, स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व, तसेच संतुलित जीवनशैली कशी ठेवावी याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आरोग्य हीच खरी संपत्ती असून महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे जागरूकतेने पाहिले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. आरोग्य शिबिरामुळे उपस्थित महिलांना पाळीतील स्वच्छता, पौष्टिक आहार, मानसिक व शारीरिक आरोग्य यासंबंधी उपयुक्त माहिती मिळाली. महिलांनीही या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक शंका विचारल्या. राम-रहीम मित्र मंडळाचा नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमापुरता मर्यादित न राहता सामाजिक जाणीवेचे कार्यक्रमही घेऊन येतो, हे या आरोग्य शिबिरातून पुन्हा अधोरेखित झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL