जळगाव, 2 ऑक्टोबर (हिं.स.) सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये होणारे गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आलीय. यातच बडनेरा– नाशिक रोड अनारक्षित मेमू रेल्वे गाडीला आणखी काही महिन्यांसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना देखील दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून चालविण्यात येणाऱ्या बडनेरा–नाशिक रोड-बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष मेमू रेल्वे गाडीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ होती. मात्र सध्या सणासुदीच्या काळात रेल्वेत होणारी गर्दी लक्ष्यात घेता ०१२११/१२ बडनेरा–नाशिक रोड-बडनेरा अनारक्षित मेमू रेल्वे गाडीला १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत एकूण ९२ फेऱ्या मेमू रेल्वे गाडीच्या होतील
बडनेरा ते नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या या मेमू रेल्वे गाडीला जळगाव जिल्ह्यात बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव आणि चाळीसगाव येथील स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. विशेषतः दिवाळीसह इतर सणांच्या वेळी होणाऱ्या गर्दीच्या काळात बडनेरा–नाशिक रोड मेमू रेल्वे गाडी खूपच उपयुक्त ठरते. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दर तीन महिन्यांनी वारंवार मुदतवाढ देण्यापेक्षा ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर