पुणे, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।
पूरस्थितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडून त्याआधी महापालिकांच्या निवडणुका घेण्यासंबधीची चाचपणी सुरू आहे. महापालिकांच्या निवडणूक प्रकियेबाबत तयारी करा, अशा पद्धतीच्या सूचना प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आल्या असून, त्यानुसार येत्या दोन दिवसांत अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे.
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा यांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आता 31 जानेवारी 2026 पर्यंत या सर्व निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या मतदान यंत्राच्या उपलब्धतेनुसार पहिल्या टप्प्यात दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुका घेऊन जानेवारी महिन्यात सर्व महापालिकांच्या निवडणूका घेण्याचे नियोजन केलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु