नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर (हिं.स.)दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता कमी आहे. चाहते त्याला भारतात खेळताना पाहण्यास उत्सुक होते. पण रोनाल्डो या दौऱ्यावर येणार नाही अशी माहिती आहे. सौदी अरेबियाचा अव्वल क्लब, अल नासर, सोमवारी रात्री एफसी गोवा विरुद्धच्या एएफसी चॅम्पियन्स लीग २ च्या सामन्यासाठी पोहोचणार आहे. पण २२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो पाहुण्या संघासोबत येण्याची शक्यता कमी आहे.
एफसी गोवा व्यवस्थापनाने वारंवार विनंती केल्यानंतरही, ४० वर्षीय रोनाल्डो अल नासर संघाचा भाग राहणार नाही. एफसी गोवाने माजी एएफसी कप विजेते अल सीब यांना पराभूत करत चॅम्पियन्स लीगच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला. त्यानंतर, त्यांना स्पर्धेच्या या टप्प्यासाठी अल नासरसह गट डीमध्ये स्थान देण्यात आले आहे. रोनाल्डो काही काळापासून या सौदी अरेबियाच्या क्लबकडून खेळत आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकात खेळू इच्छिणारा रोनाल्डो त्याच्या कामाचे व्यवस्थापन करण्यावर आणि स्वतःला विश्वचषकात भाग घेण्याची संधी देण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहे. एफसी गोवा विरुद्धच्या सामन्यानंतर अल नासर संघाचा २८ ऑक्टोबर रोजी किंग्ज कप राउंड ऑफ १६ मध्ये प्रतिस्पर्धी अल इत्तिहादशी सामना रंगणार आहे .
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे