रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) | कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथील बी ए योगशास्त्र विषयातील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी निकिता लाड हिची अखिल भारतीय योग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निकिताने सहाव्या महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतला. रत्नागिरीमध्ये पार पडलेल्या निवड फेरीत तिची निवड झाली होती. यानंतर चंद्रपूर येथील आनंदवन ठिकाणी झालेल्या राज्यस्तरावरील स्पर्धेत 18 ते 28 या वयोगटात लेग बॅलन्स इव्हेंट आणि बॅक बेंड इव्हेंट या दोन्ही प्रकारात कास्य पदक मिळविले होते.
विश्वविद्यालयाच्या वतीने प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज योग कक्ष येथे आंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धा निवड फेरी घेण्यात आली होती. त्यात एकूण २७ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यातील १२ विद्यार्थ्यांची बंगळुरू व चेन्नई येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यात निकिता लाडचा समावेश आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून निकिता लाड विश्वविद्यालय आणि उपकेंद्राचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे.
निकिताच्या यशाबद्दल संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. अतुल वैद्य, रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, उपकेंद्रातील योग विभागातील प्रा अविनाश चव्हाण, प्रा. अक्षय माळी, प्रा. कश्मिरा दळी यांनी अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी