शोलेमधील 'जेलर'ने घेतली एग्झिट
मुंबई, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : सहज आणि दर्जेदार अभिनय, विनोदाचे अचूक टायमिंग आणि आगळी-वेगळी शैली यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख बनवणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज, सोमवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेते असा लौकिक असलेल्या असरानी यांना फुफ्फुसांचा आजार होता. गेल्या 5 दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या आरोग्य निधी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच उपचारादरम्यान दुपारी 4.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. निधनानंतर त्यांचे पार्थीव सांताक्रूझ परिसरातील शस्त्रीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. सांताक्रूझ येथेच त्यांचे कुटुंबिय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती असरानी यांचे व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी दिली.
विनोदी अभिनयाची एक समृद्ध परंपरा संपली
असरानी यांचा जन्म 1941 मध्ये राजस्थानात झाला. त्यांचे वडील कार्पेटचा व्यवसाय करायचे. असरानी यांना 3 भाऊ आणि 4 बहिणी होत्या. असरानींचे शालेय शिक्षण सेंट झेविअर्स स्कूल जयपूर येथे झाले. त्यानंतर त्यानी पदवी संपादित केली आणि मुंबईचा रस्ता धरला. ‘हरे कांच की चूड़ियाँ’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या अभिनयातली सहजता, वेगवेगळ्या ढंगातल्या विनोदी भूमिका साकारण्याची हातोटी यामुळे ते लवकरच प्रेक्षकांचे लाडके झाले.
त्यांनी 'शोले' चित्रपटातील 'जेलर' ही अजरामर भूमिका साकारली होती. ही भूमिका हिटलरसदृश विनोदी ढंगात साकारल्यामुळे प्रचंड गाजली. त्यांची चालण्याची ढब, संवादफेक, आणि अंगभूत विनोदबुद्धी यामुळे ही भूमिका आजही लोकांच्या लक्षात राहिली आहे. असरानी यांनी आपल्या 4 दशकांहून अधिक कारकिर्दीत 600 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ‘गुड्डी’, ‘अभिमान’, ‘छोटीसी बात’, ‘पति पत्नी और वो’, ‘चुपके चुपके’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर आणि सहकलाकार म्हणूनही त्यांनी आपली छाप पाडली.
खाजगी आयुष्य
गोवर्धन असरानी यांनी 1973 मध्ये मंजू बन्सल यांच्याशी विवाह केला होता. त्यांचा मुलगा डॉ. नवीन असरानी दंतचिकित्सक (डेंटिस्ट) असून गुजरातच्या अहमदाबादमध्ये त्यांचा दवाखाना आहे.
चित्रपटांव्यतिरीक्त, त्यांनी 2004 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काही नेत्यांचा प्रचारही केला होता. अभिनयाच्या प्रारंभीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. असरानी यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी भूमिकांमध्ये एक संपन्न युग संपुष्टात आलं आहे. त्यांच्या अभिनयाच्या शैलीने अनेक पिढ्यांना आनंद दिला.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी