
वॉशिंग्टन, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाउनचा व्यापक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील हवाई वाहतूक केंद्रात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या उड्डाणांना काही काळासाठी थांबवावे लागले. या कारणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ आणि घबराट पसरली. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने याबाबत माहिती देताना सांगितले की, शिकागो, वॉशिंग्टन आणि नेवार्क (न्यू जर्सी) येथील विमानसेवाही कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे उशिराने सुरू आहेत.
अमेरिकेचे परिवहन मंत्री सीन डफी यांनी अंदाज वर्तवला आहे की, पुढील काही दिवसांत आणखी अनेक उड्डाणे उशिरा होतील किंवा रद्द करावी लागतील, कारण देशातील हवाई वाहतूक नियंत्रकांना संघीय सरकारच्या ‘शटडाउन’ काळात वेतनाशिवाय काम करावे लागत आहे.
सीन डफी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, “अनेक नियंत्रक आजारी असल्याचे सांगत आहेत, कारण वेतन न मिळाल्यामुळे आर्थिक ताण वाढला आहे आणि आधीच अवघड असलेले त्यांचे काम आणखी तणावपूर्ण झाले आहे.”दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाने म्हटले आहे की, जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प स्वतः हस्तक्षेप करत नाहीत, तोपर्यंत या समस्येचे निराकरण शक्य नाही. सध्या अमेरिकेतील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
शटडाउनमुळे सामान्य नागरिकांचे जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अमेरिकेतील मेरीलँड, कॅलिफोर्निया, अॅरिझोना आणि टेक्सस यांसारख्या शहरांमध्ये हजारो लोक मोफत अन्नासाठी फूड बँकसमोर तासन्तास रांगेत उभे आहेत.
शटडाउनमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थांबले आहेत, त्यामुळे त्यांच्या हातात ना पैसा उरला आहे ना निश्चित नोकरी. आता स्थिती इतकी बिकट झाली आहे की फूड बँकांमध्येही अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे.
अमेरिकेत शटडाउन १ ऑक्टोबरपासून सुरू झाला, जेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी अल्पकालीन आर्थिक सहाय्याच्या प्रस्तावाला नकार दिला आणि मागणी केली की त्या विधेयकात ‘अफोर्डेबल केअर अॅक्ट’ अंतर्गत आरोग्य विम्यासाठी संघीय अनुदानाचा विस्तार समाविष्ट केला जावा.
सध्या शटडाउनचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम दिसत आहे आणि सामान्य जनता त्याचा सर्वाधिक फटका सहन करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode